मंगरूळपीर(Washim):- शॉक लागल्याने बापलेकासह चुलत भावाचा जागीच मृत्यू (Death)झाला. मंगरूळपीर तहसील अंतर्गत असलेल्या पांगरी महादेव येथील शेतशिवारात 12 जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. मात्र, सायंकाळी उशिरा उघडकीस आली.
विद्युत प्रवाहाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार मारोती अशोक पवार वय २० व त्याचा चुलत भाऊ दत्ता राजू पवार वय १८ हे दोघे शेतातील पिकावर फवारा (spray) करत होते. तेथेच शेतातील मचाणावर साध्या जीआय ताराने विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेतलेला होता. हा तार तुटून शेतात पडला आणि दोन चुलत भावांना फवारणी करत असताना याचा शॉक (Shock)लागून त्यांचा मृत्यू झाला. मुलांना शेतात जाऊन बराच वेळ झाला, मात्र अजूनही ते घरी परत आले नाहीत, म्हणून मारोतीचे वडील अशोक माणिक पवार वय ३८ त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले तेव्हा, त्यांना दोन्ही मुले जमिनीवर कोसळलेली दिसली. मुलांना काय झाले ? हे पाहण्यासाठी अशोक पवार जवळ गेले असता, त्यांनाही या विद्युत प्रवाहाचा(electric current) शॉक लागल्याने त्यांचाही मृत्यू झाला आहे. अंधारही पडला, मात्र मुले व वडील घरी आले नाहीत, म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्य व गावातील नागरिक त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले तेव्हा विद्युत प्रवाहाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे त्यांना माहिती पडले. या घटनेने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.