७ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
वाशिम (Washim Crime) : स्थानिक नगर परिषदेमार्फत येथील पुसद नाका परिसरात महात्मा गांधी विद्यालयाजवळ बांधलेले तीन मजली व्यापारी संकुलमधील दुकान तक्रारदार यांचे नावावर रजिस्टर भाडे पट्टा करण्याकरिता १० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७ हजार रुपये लाच स्वीकारणारा येथील नगर परिषदेचा सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैभव देविदास पांडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना २ ऑगस्ट रोजी रंगेहाथ पकडले.या कारवाईमुळे नगर परिषदेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांना नगर परिषदेचा सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैभव पांडे याने तक्रारदार यांचे नगर परिषद मार्फत पुसद नाका येथील महात्मा गांधी विद्यालया जवळ बांधलेल्या ३ मजली व्यापारी संकुलमधील दुकान तक्रारदार यांचे नावावर रजिस्टर भाडे पट्टा करण्याकरीता शासकीय पावती फि १५ हजार रूपया व्यतिरिक्त अधिकचे १० हजार रुपये लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने आपली तक्रार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
दुकानाचे रजिस्टर भाडे पट्टा करण्याकरीता मागितली होती लाच
त्यानंतर नगर परिषदेचा सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैभव पांडे याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी कारवाई दरम्यान १० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ७ हजार रूपये लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या २ ऑगस्ट रोजीच्या सापळा कारवाई दरम्यान सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैभव पांडे यांने शासकीय पावतीचे १५ हजार रुपये व तडजोडीअंती ठरलेली लाच रक्कम ७ हजार रुपये असे एकुण २२ हजार रूपये एकत्रित स्वतः तक्रारदार यांच्याकडून स्विकारली.
यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने न.प. कर्मचारी वैभव पांडे यास ताब्यात घेतले असून, त्याचेविरुद्ध पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीचे पोलिस अधिक्षक मारोती जगताप व अप्पर पोलिस अधिक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात वाशिमचे पोलीस उपअधीक्षक गजानन आर.शेळके,पोलिस हवालदार नितीन टवलारकर, विनोद मार्कंडे , योगेश खोटे, संदिप इढोळे यांनी केली.