मानोरा(Washim):- आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असुन येत्या काही तासात राजकीय पक्षांच्या उमेदवाराची यादी समोर येणार आहे. त्यामुळे कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात कोणत्या राजकीय पक्षावर कोण उमेदवार जाहीर होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर अनेक भावी इच्छूक उमेदवार मतदार संघात उमेदवाराची माळ आपल्या गळ्यात पडावी याकरीता मुंबई (Mumbai)येथे ठाण मांडून बसले आहेत. राजकीय पक्षाचे उमेदवार कोण याकडे मतदार राजांचे लक्ष लागले आहेत.
राजकीय पक्षाचे उमेदवार कोण याकडे मतदार राजांचे लक्ष
मागील दहा वर्षांपासून कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघ भाजपाचा गड राहीलेला आहे. या मतदार संघात दोन्ही वेळा लोकनेता स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचा विजय झाला होता. यावेळी महायुतीत मतदार संघ भाजपाकडेच राहणार आहे. पण उमेदवार कोण राहणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha elections)विजय प्राप्त केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) शरद पवार, काँग्रेस(Congress) व उबाठा शिवसेना पक्षाने उमेदवारी आमच्याच पक्षाला मिळावी यासाठी दावेदारी केली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात उमेदवारीसाठी घमासान राडा सुरू आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीही आगामी विधानसभा निवडणुकीत ताकतीने उतरणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते. गेल्या अडीच वर्षात मोठ्या राजकीय खेळ्या झाल्या आहेत. त्यामुळे यावेळच्या राजकीय पक्षाकडून कोणता उमेदवार येणार यासोबतच अपक्ष उमेदवारी कोण दाखल करणार या सर्व घडामोडीचा फायदा व नुकसान कोणाला होणार हे येणाऱ्या काळात दिसत असेल तरी राजकीय पक्षाच्या उमेदवारीबाबत जनता जनार्दनमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.