मानोरा(Washim):- राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूर येथे झाला. राज्याच्या मंत्रिमंडळात यंदा एखाद्या तरी आमदाराला मंत्रिपद मिळेल अशी दाट शक्यता असताना जिल्हयाला मंत्रिपदात दुसर्यांदाही हुलकावणी दिली आहे. लगतच्या यवतमाळ जिल्हयाला दोन कॅबिनेट तर एक पद असे एकूण तीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. वाशिम जिल्ह्याला मंत्रिपदाची हुलकावणी मिळाल्याने आकांक्षित जिल्हयातील मतदारात नाराजी व्यक्त होत आहे.
यवतमाळ जिल्हयाला तीन मंत्रीपद
महाराष्ट्रात झालेल्या नुकत्याच विधानसभा निवडणुकीत वाशिम जिल्हयाच्या मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला. यामध्ये वाशीम – मंगरूळपीर मतदारसंघातून भाजपाचे श्याम खोडे तर कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघातून (Assembly constituencies)सई डहाके यांना मतदारांनी निवडून दिले. तर एका जागेवर रिसोड – मालेगाव मतदार संघातून महाविकास आघाडी काँग्रेसचे अमित झनक हे निवडून आले. मागील वेळच्या निवडणुकीतही महायुती भाजपाचे दोन तर महाविकास आघाडी काँग्रेसचा आमदार निवडून आला होता. यंदाच्या निवडणुकीतही महायुती भाजपाचे दोन व काँग्रेसचा आमदार निवडून आलेला आहे. अशावेळी या मंत्रिमंडळात महायुतीला एखादा तरी मंत्रिपद निश्चित मिळेल अशी शक्यता वाशीम जिल्हा वाशीयांना होती; परंतु १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वाशीम जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नसल्याने जिल्ह्यातील नागरिकाकडून नाराजी व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीचे दोन आमदार निवडून दिले; परंतु मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सुर उमटत आहे.
यापूर्वी अनंतराव देशमुख व सुभाषराव ठाकरे यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते. तर महाविकास आघाडीकडून सुभाषराव झनक यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे होते. त्यानंतरच्या मंत्रिमंडळात एकदाही वाशीम जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला; परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीचे दोन आमदार निवडून दिलेले असताना तिन्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी वाशीम जिल्हयाला मंत्रीपद दिले नसल्याने मतदारांची घोर निराशा झाली आहे.