मानोरा (Washim):- बंजारा समाजाचे काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आगामी ५ ऑक्टोंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते बंजारा विरासत नंगारा भवनाच्या लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने पोहरदेवीत नंगारा भवन पाहणी करीता राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ – वाशीम जिल्हयाचे पालकमंत्री लोकनेते संजय राठोड यांनी माहिती दिली.
संपूर्ण देशभरातून बंजारा समाजाचे भाविक पोहरादेवी येथे दर्शनासाठी येतात
पुढे माहिती देताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, संपूर्ण देशभरातून बंजारा समाजाचे भाविक पोहरादेवी येथे दर्शनासाठी येतात. परंतु सन २०१८ पर्यंत येथे कोणत्याही प्रकारच्या योग्य सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या म्हणून भाविकांना अडचणीचा सामना करावा लागत होता . वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री पदी विराजमान होताच मला दिवंगत धर्मगुरु राष्ट्रसंत डॉ. रामराव बापू महाराजांनी आदेशित केल्यावर सरकारच्या माध्यमातून तब्बल सातशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणण्याचे काम केले आहे. येथे येणाऱ्या देवी जगदंबा, संत सेवा, संत बापू भक्तांसाठी सोयी सुविधा तसेच भव्य असे मंदिराचे निर्माण कार्य पार पडणार आहे. सदरील काम हे प्रगतीपथावर असून सद्यस्थितीमध्ये तेथे नंगारा भवनाचे काम पूर्ण झालेले आहे. हे नंगारा भवन म्हणजे वस्तू संग्रहालय आहे.
परंपरा आणि संस्कृती ही सर्वांसमोर ठेवण्यात येणार आहे
या नंगारा भवनाच्या माध्यमातून समाजाचा इतिहास, रूढी, परंपरा आणि संस्कृती ही सर्वांसमोर ठेवण्यात येणार आहे. सदरील नंगारा भावनाच्या लोकार्पणाचा सोहळा आगामी ५ ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. संपूर्ण विश्वात बंजारा समाजाची लोक राहतात भारत भरामध्ये अनेक राज्यांमध्ये बंजारा समाज विखुरलेला असला तरी एक बोली, एक भाषा, एक पेहराव, समाजातील रूढी, परंपरा एकच असताना वेगवेगळ्या राज्यामध्ये आरक्षण हे वेगळ्या कॅटेगिरी मध्ये का? असे म्हणून समाजासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण भारत भरातील समाजाला एकाच कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळावे अशी ऐतिहासिक मागणी माझे गुरू संत रामराव बापू यांची होती . त्यामुळे त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी याकडे तिर्थक्षेत्र ठिकाणावरून विनंती करणार आहे. म्हणून या कार्यक्रमासाठी समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत धर्मगुरु बाबुसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, भक्तराज राठोड महाराज, राहूल महाराज, दिलराज बंजारा, तेजू पवार आदी उपस्थित होते.