मानोरा(Washim):- शेतकरी विरोधी धोरण अवलंबून केंद्रातील मोदी व राज्यातील मिंधे सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत(Assembly Elections) सत्ताधारी सरकारला घरी बसावा, असे शेतकऱ्यांना आवाहन महाविकास आघाडी तर्फे दि. १३ सप्टेंबर रोजी तहसिल कचेरीवर पार पडलेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनात मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे नेते माजी आ. अनंतकुमार पाटील यांनी केले. महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन नंतर विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले.
मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, सहाही महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीची कपाशीला ५० हजार तर सोयाबीनला २५ हजार रूपये अनुदानीत शासनाची मदत द्या, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, २०२३ मधील उर्वरित ७५ टक्के पिक विम्याची रक्कम द्या, खरडून गेलेल्या जमिनीचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी धरणे आंदोलनात डॉ श्याम जाधव नाईक, अनिल राठोड, बाबुसिंग नाईक, भोजराज चव्हाण, ज्योतीताई गणेशपुरे, डॉ चंदनशिव, रविंद्र पवार आदींनी भाषण करून महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी काशीराम राठोड, डॉ विठ्ठल घाडगे, मनोहर राठोड, इफ्तेखार पटेल, डॉ सुरेश जाधव, मुकिंद आडे, रमेश जाधव आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो शेतकरी उपस्थित होते.