कारंजा (Washim) :- स्थानिक माळीपुरा येथील एकवीरा देवी मंदिरासमोरून अज्ञात चोरट्याने लंपास केलेला ट्रक हस्तगत करण्यात येथील शहर पोलीस स्टेशनच्या(Police Station) गुन्हे प्रकटीकरण कक्षाला यश आले असून, यात एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
कारंजाच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी
कारंजा शहर पोलिस स्टेशन येथे ६ सप्टेंबर रोजी फिर्यादी मोहसिन खान अनिस खान (४१ रा. डाफनीपुरा कारंजा) यांनी त्यांच्या मालकीचा आठ लाख रुपये किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण पोलिसांनी कलम ३०३ (२) भा.न्या.सं. २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतले होते. सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान गोपनिय माहितीच्या आधारे गुन्हयात चोरी गेलेला ट्रक वरोरा जि. चंद्रपुर येथील एम.आय.डी.सी. मध्ये उभा आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी एक तपास पथक नेमून मिळालेल्या माहितीप्रमाणे ट्रक व आरोपी शोधकामी तपास पथक रवाना केले. तपास पथकाने गुन्ह्यात चोरीस गेलेला ट्रक व आरोपी अशोक छोटेलाल पातालबंन्सी (रा. मालविय वार्ड, वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपुर) यास अटक केली असून, आरोपीस ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश जाधव करीत आहेत. दरम्यान, सदर कारवाई पोलीस अधिक्षक अनूज तारे, अप्पर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, पोउपनि अर्जुन राठोड, पोहेका मयुरेश तिवारी , उमेशकुमार बिबेकर , पोकॉ अमीत भगत व इतरांनी केली.