मानोरा (Washim) :- काही वर्षा पूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण भागात आज वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे. गॅसचे भाव १२०० रुपये व राकेल मिळत नसल्याने सरपणाकरिता, तसेच मानोरा तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी शेतातील बांधावर असलेल्या झाडावर वानरे बसून शेत पिकाचे नुकसान करीत असल्याने शेतजमिनीतील वृक्ष शेतकरी (Farmer) कारंजा, मंगरूळपीर, पुसद येथील कंत्राटदारांना विकत आहेत.
शेतजमिनीतील वृक्ष शेतकरी कारंजा, मंगरूळपीर, पुसद येथील कंत्राटदारांना विकत आहेत
इमारतीचे लाकूड व फर्निचर(Furniture) बनविण्यासाठी जंगलातील बहुमुल्य सागवान वृक्षांची कत्तल होत आहे. तसेच आड जात वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. मानोरा तालुक्यात वृक्ष लागवड ही अत्यल्प असल्याने वृक्षतोडीच्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. २० ते २५ वर्षापूर्वी मानोरा तालुक्यात जळावू लाकडे मोठ्या प्रमाणात मिळत होती. आज ती मिळणे दुर्मिळ झाली आहेत. त्यात रुई ,गोस्ता, पाळोदी, रतनवाडी, फुलउमरी, सोमेश्वर नगर, उमरी, शेंदोना, आमदरी, आसोला खुर्द इत्यादी गावे जंगलात व्यापली आहेत. जंगलमाफिया, लाकूड ठेकेदार हे वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून वृक्षतोड करून पैसा कमावित आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. परंतु पाहिजे त्या प्रमाणात वृक्ष उभे दिसत नाही. ते फक्त कागदोपत्रीच दिसत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जंगल क्षेत्रात भटकंती केली तर हजारो वाळलेले वृक्ष भुईसपाट झालेली दिसत आहेत. वृक्ष कटाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. आजस्थितीत जंगलावर उपजिविका करणारी आणि अवैध वृक्षतोड करणारी माणसे बेधडक जंगलाचे वाळवंट करीत असून वाळलेल्या लाकडासह नवीन झाडावरही आरी हत्याराने कत्तल केली जात आहे.