मानोरा (Washim):- विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेचा चौथा हप्ता राज्य सरकारने (State Govt) बुधवार (दि. 25) डिसेंबर पासून खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली. निवडणुकीत 2100 रुपयांचे आश्वासन दिलेल्या भावाने सत्तेवर येताच केवळ दीड हजारांवर बोळवण केल्याने बहिणी हिरमुसल्या आहेत. दरम्यान, बजेट सादरीकरणानंतर मात्र आश्वासनाची पूर्तता करण्याचे सरकारने यापूर्वीच जाहीर केले. यामुळे बहिणींना आता कधी एकदा बजेट सादर होईल असे वाटत आहे.
2100 रुपयांचे आश्वासन दिलेल्या भावाने सत्तेवर येताच केवळ दीड हजारांवर बोळवण केल्याने बहिणी हिरमुसल्या
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील बहिणींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नामी शक्कल लढवत दरमहा दीड हजार रुपयांची घोषणा करत सन्मान निधी सुरू केला. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच सरकारने नोव्हेंबरपर्यंचे सर्व हप्ते खात्यात जमा केले. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर विधानसभा निवडणुका(Assembly elections) घोषित झाल्या. त्यादरम्यान सत्ताधाऱ्यांसह इतर पक्षांनीसुध्दा आम्ही सत्तेवर आलो तर 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. यामुळे महिलांनी सत्ताधारी पक्षांना भरभरून मतदान करत सत्तेची पुन्हा संधी दिली. यामुळे लाडक्या बहिणींना अपेक्षा होती ती एकवीशे रुपयांची मात्र बजेटचे कारण देत सरकारने आता पूर्वीचीच रक्कम म्हणजे पंधराशे रुपये देण्यास सुरुवात केली आहे. जिथे एकवीशे रुपयांची अपेक्षा होती तिथे पंधराशे रुपये जमा होत असल्याने लाडक्या बहिणी मात्र काहीशा हिरमुसल्याचे दिसून येत आहे.