मानोरा(Washim):- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर निसर्गाच्या सानिध्यात डोंगराळ माळ रान पठारावर वसलेल्या अति मागासलेल्या आकांक्षीत मानोरा तालुक्यातील जनतेचा उदनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. शेतातील खरीप हंगामातील सोयाबीन व मूग उडीद, कापूस या नगदी पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी (Farmers)व शेतमजूर दिवाळीच्या कालखंडात शेती रिकामी झाल्यावर येथील शेतमजूर व कोरडवाहू शेतकरी कामाच्या शोधात कुटुंबासह आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व पोटाची खळगी भरण्यासाठी दिवाळी होताच कामगार म्हणून ऊस तोडीसाठी परप्रांतात रवाना होताना दिसत आहे.
बंजारा व आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर
मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नसल्यामुळे येथील ६० टक्के शेतमजूर , कोरडवाहू शेतकरी पुणे, मुंबई (Mumbai) या महानगरात तर काही मजूर वर्ग पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतरित होत आहे. आपल्या मुलांचे शिक्षण अर्धवट सोडून शेंदुरजना, रुई, गोस्ता, वटफळ मेंद्रा, कारपा, आसोला खुर्द , पाळोदी, इंगलवाडी, शिवनी, हातोली, फुलउमरी, रतनवाडी, उज्ज्वलनगर या खेडेगावातील लोक आता दिवाळी दारावर असताना घराला कुलूप लावून बिराड डोक्यावर घेऊन ऊसतोडीसाठी स्थलांतर वाहनात जथेच्या जथे भरून जात आहे. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला सर्व लोक घरी येतात, परंतु तालुक्यातील जनतेला कामाच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याने या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा भगीरथ उदयास येईल का असा सवाल गरीब मजूर वर्ग व कोरडवाहू शेतकरी करीत आहे.
वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्व दूरच नव्हे तर दिल्ली राजधानी पर्यन्त परिचित
तालुक्यातील शेतकरी शेतमजूर दरवर्षी स्थलांतरित होतात, अशा स्थितीत त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित रहावे लागत आहे. आकांक्षीत वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्व दूरच नव्हे तर दिल्ली राजधानी पर्यन्त परिचित आहे. या जिल्ह्यातील मानोरा तालुका हा अति मागासलेला आकांक्षीत तालुका म्हणून तर ओळखला जातो. आता तालुकाची ओळख मजुरीसाठी भटकंती करणारा तालुका म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्र कर्नाटकसह विविध राज्यात मानोरा तालुक्यातील मजूर आपल्या मुलाबाळासह ऊस तोडणीच्या कामावर निघून जातात, दिवाळीच्या आधीच ६० टक्के कुटुंब ऊस तोडणी साठी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच कर्नाटक येथे जातात.
दिवाळीच्या पुर्वसंध्येला घराला कुलूप
आपआपल्या मुलाबाळाची काय म्हणून हे मंडळी आपल्या सोबत शिकत असलेल्या लहान मुलांना सुद्धा घेऊन जातात, त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहतात व पुढे ते देखील हेच काम करतात. या गंभीर बाबीकडे शासन व प्रशासन यंत्रणा लक्ष वेधतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे, जर शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सुविधा असती तर या कुटुंबावर आपल्या चिमुकल्यासह स्थलांतरित होण्याची वेळ आली नसती पण वास्तव फार भयानक असल्यामुळे याकडे केंद्र व राज्य सरकार लक्ष देईल काय? यानिमित्ताने असा प्रश्न गोरगरिबांना भेडसावत आहे.