वसमत ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील घटना
हिंगोली (Hingoli Crime) : वसमत ग्रामीण पोलिस ठाणे (Wasmat Police) हद्दीतील हापसापूर येथे १ जुलै रोजी सांयकाळी ७ च्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी महिंद्रा कार खरेदी करण्याच्या बहाण्याने ट्रायल मारण्यासाठी शहराबाहेर नेवून लक्ष्मण रमेश संवडकर यांच्या गळ्याला चाकू लावून वाहनाच्या खाली ढकलून कार जबरीने चोरून नेल्यासंदर्भात (Wasmat Police) वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास (Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
स्थानिक गुन्हे शाखेने लावला गुन्ह्याचा छडा
गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरविले असता हे चोरटे अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. ज्यामध्ये सोहेल खान परवेज खान रा.मेमनपुरा दिपक चौक अकोला, मोहंमद अफजल मोहंमद मेमन रा.लकडगंज फिरदोस कॉलनी अकोला ह.मु.रिसाला बाजार हिंगोली, शेख मेहबुब शेख अन्सार आवेज खान युसूप खान रा.खैरमोहंमद शबनम नगर अकोला यांची नावे आली. हे चोरटे कार विक्रीसाठी नागपूर येथे गेल्याची माहिती मिळताच (Wasmat Police) पोलिसांनी नागपूर येथे जाऊन शेख मेहबुब शेख अन्सार, आवेस युसूफ खान या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. इतर दोन चोरटे कार घेऊन राजस्थानला पळून गेल्याचे समजताच त्यांचा माग घेऊन पथक मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात गेले. तेथे दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेऊन चोरीतील कार क्रमांक एम.एच.३८-ए.डी.६५९५ व गुन्ह्यात वापरलेले ४० हजाराचे मोबाईल असा एकूण ६ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
पथकाचा सलग ४८ तासात २ हजार कि.मी.चा प्रवास
स्थनिक गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने चारही चोरट्यांसाठी सलग ४८ तासात २ हजार कि.मी.चा प्रवास करून चोरीतील कार जप्त केली. ही कारवाई पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सपोनि राजेश मलपिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरीभाऊ गुंजकर, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली आहे.