मृदू व जलसंधारण विभागाचा प्रताप
सडक अर्जुनी(Sadak Arjuni):- जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग गोंदिया (Water Conservation Department Gondia) अंतर्गत पाणी अडवा, पाणी जिरवा योजना राबविण्यात येते. सदर योजना म.रा.शासन जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) यांचे कडून निधी उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजनेंतर्गत बांधलेले बंधारे पांढरे हत्ती ठरलेले आहेत. या बंधार्यात उन्हाळ्यात पाणीच राहत नसल्याने कोरडेच असतात. त्यामुळे ही योजना पैसा जिरवा योजना ठरली आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेला हरताळ
सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा म्हसवानी येथे सन २०१४-१५ मध्ये बांधलेल्या बंधार्यावर दर दोन वर्षानंतर रिपेरींगच्या नावावर रिपेरींगचे काम करण्यात येते. पण रिपेरींग करुनसुद्धा बंधार्यात पाणी साठवूण राहत नाही. कित्येक वेळा बंधार्याच्या साईड वॉल (Side wall) पाण्याने वाहून जाते. असेच प्रकार संपूर्ण सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव(Arjuni Morgaon) या दोन्ही तालुक्यात बांधलेल्या बंधा-यावर पहायला मिळते. मृदू व जलसंधारण विभागांतर्गत बांधलेले बंधारे पावसाळ्यात पहिल्याच पावसाने वाहून जातात. जलसंधारण विभागाचे मुख्य अधिकारी व उपविभागिय अधिकारी , शाखा अभियंता व कंत्राटदार यांचे संगनमताने बंधार्याचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
निकृष्ठ बांधकामाची चौकशी न झाल्यास जनहित याचिका दाखल
सदर बंधार्याचे निकृष्ठ बांधकामास मुख्य अधिकारी, उपविभागिय अधिकारी, शाखा अभियंता व कंत्राटदार कारणीभूत ठरले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. नियमबाह्य व नियोजनशून्य निकृष्ठ बांधकामाची चौकशी न झाल्यास जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. सन२०२३-२४ मध्ये मृदू जलसंधारण विभाग गोंदिया अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी येथील साठवण बंधारा रिपेरींगच्या कामासाठी एक कोटी वीस लाख रुपये मंजूर केले असून रिपेंरींगच्या नावांवर मागिल एक महिन्यापासून तालुक्यातील डव्वा येथील कंत्राटदार राऊत काम करीत आहेत.
योजनेला सुरुंग लागल्याचे चित्र
शासन एकीकडे मृदू व जलसंधारण विभाग अंतर्गत नाले, ओढे यांचे माध्यमातून वाहत जाणारे पाणी अडवून भुजल पातळी वाढविणे सोबतच नाल्याजवळील शेतीला पाणीपूरवठा करण्याचे धोरण अवलंबविले आहे. त्यामुळे जंगली प्राणी यांना पाणी मिळेल. हा या योजनेचा मुख्य हेतू होता. मात्र भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार यांचे संगनमताने शासनाचे या योजनेला सुरुंग लागल्याचे चित्र सडक अर्जुनी तालुक्यात बांधलेल्या साठवण बंधार्यावरून दिसत आहे. काही ठिकाणी सपाट जागेवर साठवण बंधार्याचे बांधकाम करण्यात आल्याने पावसाळ्यात सुद्धा पाणी साठवत नाही.
बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने पावसाळ्यात पहिल्या पाण्याने वाहून गेले
काही बंधार्याचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने पावसाळ्यात पहिल्या पाण्याने वाहून गेले आहेत. कागदोपत्री बंधार्याचे बांधकाम प्रत्यक्षात दिसत असले तरी नियोजना अभावी या बंधार्याचे बांधकाम उपयोग शून्य आहे. बंधार्यात पाणी अडत नसल्याने शेती, वन्यप्राणी तर सोडाच पण मुख्य उद्दीष्ट म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा… भुजल पातळी वाढवा या उद्देशाला तडा गेल्याचे दिसून येते. आज कोट्यावधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले साठवण बंधारे पांढरे हत्ती ठरलेले आहेत. तरीपण रिपेंरींगचे नावावर कोट्यावधी रुपये आजही खर्च करणे सुरु आहे. त्याची हवा स्थानिक सरपंच व पदाधिकारी यांना लागत नाही. नियोजना अभावी निकृष्ठ दर्जाचे बांधकाम (Poor quality construction) व मोठ्याप्रमाणात झालेला भ्रष्टाचार यामुळे शासनाने ज्या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले. ते सर्व पाण्यात वाहून गेले. मागिल दहा वर्षापासून आम्ही हा प्रकार बघत आहोत. तसेच स्थानिक ग्रा.प.च्या हद्दीत सुरू असलेल्या बांधकामाबाबत कसलीही माहिती देण्यात आली नाही.