गोंदिया (Gondia) :- गोंदिया जिल्ह्यात 9 सप्टेंबर पासून पावसाने थैमान घातले आहे.त्यामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा येथील रस्त्यावर पाणी असल्याने जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटल्याने शासकीय आणि खाजगी कामा निमित्त जाणाऱ्यांना परत यावे लागले आहे. तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी (Heavy rain) झाली असुन याचा फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी/मोरगाव तालुक्याला बसला. यात केशोरी-चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचा मागील 5 महिन्यापासून बांधकाम सुरु आहे. या साठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र आलेल्या मुसळधार पावसाने पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकी करिता बंद आहे.यामुळे अर्जुनी/मोरगाव तालुका मुख्यालयाचा संपर्क तुटला आहे.
शेतकरी आणि विद्यार्थांसह सामान्य नागरिकांना फटका
तर केशोरी-खोळदा मार्गावरील वडेगाव/बंध्या गावाजवळ गाढवी नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने केशोरी-ब्रम्हपुरी बस सेवा बंद झाली असुन याचा फटका दवाखान्यात जाणाऱ्या नागरिकांनासह शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना, शाळेचे विद्यार्थी व ये-जा करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना बसला आहे.तर दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम धान पिकाच्या निंदणाचे कामे सुरु असल्याने शेतकरी देखिल आपल्या शेतात तसेच शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. तर गोठणगाव येथील इटीयाडोह धरण 24 जुलै ओव्हरफ्लो झाला होता तेव्हा पासुन ओव्हरफ्लो (Overflow) सुरुच असुन मधल्या काळात विसर्ग कमी झाला होता.परंतु काल 09 सप्टेंबर पासुन मुसळधार पाऊस सुरुच असल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरुन आज 10 सप्टेंबर रोजी 03 फुट ईतका पाण्याचा विसर्ग सुरु असुन गाढवी नदी ओसंडुन वाहत आहे. यामुळे शेकडो हेक्टर शेती पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.तर पाऊस असाच सुरु राहिल्यास केशोरी-गेवर्धा व केशोरी-कुरखेडा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे.
तर केशोरी-चिचोली मार्गावरील पुलाचे बांधकाम अपुर्ण असुन सदर रस्ता ये-जा करण्यासाठी लवकरात लवकर पुलाचे काम करावे.तसेच केशोरी-वडसा मार्गावरील वडेगाव/बंध्या-खोळदा गावाला जोडणाऱ्या गाढवी नदीच्या पुलाची उंची वाढवुन कायमस्वरुपी रस्ता वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी गावातील नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.