कर्मचारी संघटनेने निषेध नोंदवित,संबंधितावर कारवाईची मागणी
रिसोड (Risod Nagar Parishad) : रिसोड नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे आदेशान्वये शहरातील सर्व मालमत्तांवरील मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली करीता वसुली पथकातील दोन कर्मचाऱ्यांवर प्रभाग क्रमांक एक मधील काही थकीत कर धारकांनी मारहाण करीत शिवीगाळ करीत अॅक्ट्रासिटी दाखल करण्याची धमकी दिली.या संदर्भात नगरपरिषद कर्मचारी संघटनेने निषेध नोंदवित पोलिसात आरोपी विरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे.
नगरपरीषद (Risod Nagar Parishad) पथकांना शहरातील संपूर्ण मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुलीचे लक्ष निर्धारित करून देण्यात येत असते.सदर आदेशाच्या अनुषंगाने वसुली पथक प्रमुख व इतर कर्मचारी यांचेमार्फत दैनंदिनरित्या थकबाकीदार यांचे घरी भेट देऊन थकबाकी रक्कम वसूल करण्याबाबत पूर्ण प्रयत्न करण्यात येतात.सन २०२५-२०२६ या कालावधी करीता आज दिनांक १७/०२/२०२६ रोजी कार्यालयीन वेळेत श्री.नंदकिशोर पुंडलिक डाखोरे (पाणी पुरवठा अभियंता) व श्री. अमजद खान दारेफ खान पठाण (पाणी पुरवठा शिपाई) हे अहेबाब नगर प्रभाग क्र ०१ मालेगाव रोड जवळ या ठिकाणी थकीत व चालू पाणी पुरवठा वसुली करीता गेले असता सदानंद दगडू गायकवाड यांनी अर्वाच्य भाषा वापरून श्री. अमजद खान दारेफ खान पठाण (पाणी पुरवठा शिपाई) व श्री. नंदकिशोर पुंडलिक डाखोरे (पाणी पुरवठा अभियंता) यांना मारहाण करून तुम्हाला मी पाहून घेतो अशी धमकी दिली. तसेच मारहाण करणारे व्यक्ती यांनी वसुली करिता गेलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यास अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत व त्यांच्या पत्नीच्या नावाने विनयभंग करणेबाबतचा गुन्हा दाखल करणेबाबतची धमकी दिली.
या घडलेल्या अनुचित प्रकारामुळे सर्व कर्मचान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून वसुली करतांना होणारी मारहाणी आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या अश्या धमक्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होऊन जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा परिणाम कर्मचाऱ्याचे मानसीक स्वास्थ्य खालावण्यास तथा कार्यालयीन कामकाजावर तसेच शासकीय वसुलीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज घडलेल्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना जिल्हा वाशिम तसेच नगर परिषद कर्मचारी रिसोड यांचे वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात येत असून तात्काळ प्रभावाने कार्यालयीन कामकाज बंद करण्यात येत आहे.करीता सदर व्यक्ती नामे सदानंद दगडू गायकवाड यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत आपले स्तरावरून आवश्यक ते पत्रव्यवहार होणेस्तव तथा सदर प्रकरणाची वरिष्ठ कार्यालयास माहिती देऊन कर्मचार्यांच्या सुरक्षिततेबाबत योग्य त्या उपाययोजना होणेस्तव नम्र विनंती करण्यात आल्या आहे.




