खानापूर चित्ता (Hingoli):- हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अंदाजीत किंमत ९३ लक्ष २३ हजार ८६७ रुपये नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद (Zilla Parishad) अंतर्गत सुरू असून जलकुंभाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.
जलकुंभाचे काम सध्या प्रगतीपथावर
ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबावी म्हणून शासनाकडून ग्रामीण भागासाठी विविध पाणीपुरवठा योजना आज पर्यंत राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जलस्वराज प्रकल्प हा राबविण्यात आला होता. परंतु या प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेच नाही. फक्त घरापर्यंत नळ जोडणी करून काही दिवसापुरतेच पिण्याचे पाणी मिळाले.. कालांतराने हळूहळू ही योजना बंद पडली. त्यानंतर शासनाकडून आता ग्रामीण भागातील नागरिकाना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जल जीवन पाणी पुरवठा योजना राबण्यात येत आहे. मागील अनेक दिवसापासून या योजनेचे काम सुरू असून अद्याप काम पूर्ण झालेली नाही. गावातच नळ जोडणी झाली असून जलकुंभाचे काम प्रगतीपथावर चालू आहे.
जल जीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावातील नागरिकांना भरपूर पिण्याचे पाणी मिळेल
जल जीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावातील नागरिकांना भरपूर पिण्याचे पाणी मिळेल अशी अपेक्षा नागरिकांना वाटते. परंतु आज पर्यंत कार्यान्वित झालेल्या योजना किती सफल झाल्यात याचा अंदाज नागरिकांना लागला नाही. मग ही योजना सफल होईल काय? असा अंदाज नागरिक लावीत आहेत. शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी कितीही योजना आणल्या तरी त्या आजपर्यंत पाण्यातच गेल्या असल्याचे वक्तव्य नागरिक करीत आहेत. एकंदरीत खानापूर चित्ता गावासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेकडून अंदाजीत रक्कम ९३ लक्ष २३ हजार ८६७ रुपयाची योजना राबवली जात आहे. या योजनेमधून नवीन विहीर खोदकाम, पंप घर, पंपिंग मशिनरी, उद्धरण नलिका, जलकुंभ, उद्धरण नलिका चाचणी, नळ कनेक्शन, संरक्षण कुंपण, क्लोरीफिकेशन व्यवस्था, विद्युत पुरवठा आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यामधील नळ कलेक्शन व जलकुंभ काम सध्या प्रगतीपथावर आहे