अड्याळ (Bhandara):- एसटी बसला ओव्हरटेक करणे दुचाकीस्वाराच्या चांगलेच अंगलट आले. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणार्या टिप्परने दुचाकीला चिरडले. झालेल्या भीषण अपघातात (Accident)दोघांचा जागीच चेंदामेंदा होऊन गतप्राण झाले. तर एक किरकोळ जखमी झाला. सदर अपघात दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान अड्याळ-कोंढा मार्गावर नवेगाव पाले गावाजवळ घडला. रोहित वसंत कोडापे (२२), प्रविण शेखर कुडमते (२३), दोन्ही रा.सालेवाडा, असे मृतकांचे तर सचिन सिताराम उईके (३०) रा.सालेवाडा, असे जखमीचे नाव आहे.
एसटी बसला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले
पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील सालेवाडा येथील मृतक व जखमी हे दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी दुचाकीने कोंढा येथे मोबाईल(Mobile) घेण्यासाठी जात होते. नवेगाव गावाजवळ समोर असलेल्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणारा भरधाव टिप्पर क्र.एमएच ३६ एए १३६२ च्या चालकाने आपल्या ताब्यातील टिप्पर निष्काळजीपणे चालवून दुचाकीला चिरडले. त्यात दुचाकीस्वार रोहित कोडापे व प्रविण कुडमते हे ट्रकखाली चिरडून जागीच चेंदामेंदा होऊन गतप्राण झाले. तर सचिन उईके हा ट्रकबाहेर पडल्याने जखमी झाला. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अड्याळ पोलीसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. जखमीला उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे पाठविण्यात आले. मृतक रोहित याचे पश्चात वडील व एक बहिण तर मृतक प्रविण याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिण, असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर (Autopsy) त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. घटनेचा पुढील तपास पोउपनि हेमराज सोरते करीत आहेत.