परभणी (Parbhani):- राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली आहे. या योजनेसाठी उत्पन्न प्रमाणपत्र (Income certificate) आणि रहिवाशी प्रमाणपत्राची (Resident Certificates) अट टाकण्यात आलेली आहे. यामुळे महिलांसह नागरीकांनी महा- ई सेवा केंद्रावर प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळत आहे. एकाच वेळी वेबसाईटवर मोठया प्रमाणात प्रमाणपत्राची नोंदणी होत असल्याने वेबसाईट सुरळीतपणे चालत नाही. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशिर होणार आहे.
केंद्र चालकांकडून अधिकच्या पैशांची मागणी
महा – ई सेवा केंद्रावर नागरीकांनी प्रमाणपत्रे काढण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे एकीकडे वेबसाईट चालत नाही तर दुसरीकडे केंद्र चालकांकडून अधिकच्या पैशांची मागणी होत आहे. तर काही केंद्रांवर वेबसाईट(website) चालत नसल्याने प्रमाणपत्र काढण्यासाठी नकार देण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरीक जास्तीचे पैसे देऊन प्रमाणपत्र काढून देण्याची विनंती करत आहे. तसेच तहसिल कार्यालये, मनपा कार्यालय, नगर परिषद कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट सुटला आहे. नागरीकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी लागणार्या संपूर्ण कागदपत्रांची तयारी करून मंजुरी मिळून देण्याचे आश्वासन दलालांकडून पैसे घेऊन करण्यात येत आहे.
महा – ई सेवा केंद्रांच्या आय-डीचा गैरवापर
जिल्हाभरात महा – ई सेवा केंद्रांच्या अंतर्गत नागरीकांना विविध सेवांची उपलब्धता करूण देण्यात येते. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र(Caste certificate), नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्र देण्यात येतात. महा – ई सेवा केंद्रांना मान्यता देतांना जिल्हाभरात ग्रामीण भागातील नागरीकांना सोय व्हावी, या दृष्टीकोणातून प्रयत्न करण्यात आले होते. परंतू ग्रामीण भागातील मान्यता घेऊन ही महा- ई सेवा केंद्रे शहरी भागात सुरू करण्यात आली आहेत. तसेच काही ग्रामीण भागातील महा – ई सेवा केंद्रांचा आय-डी शहरी भागात मान्यता नसलेल्या ठिकाणी वापरण्यात येत असल्याचे कुजबूज नागरीकांमध्ये एैकायला मिळत आहे.