घोट (Gadchiroli) :- तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलावर रानडुकरांनी (Wild boars) हल्ला करून तीन महिलांना जखमी केल्याची कोरची तालुक्यातील घटना ताजी असतांनाच तेंदुपत्ता संकलन करणे चामोर्शी तालुक्यातील राजगोपालपूर येथील महिलांच्या जिवावर बेतले आहे. रानडुकरांच्या हल्ल्यात एक महिला ठार तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना काल ८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
रानडुकरांच्या हल्ल्यात एक महिला ठार तर दोन व्यक्ती गंभीर जखमी
मुक्ता नंदाजी कोडापे (५५) रा. राजगोपालपूर असे मृतक महिलेचे नांव आहे. प्राप्त माहितीनुसार चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तेंदुफड़ी सुरू झाल्या असून नागरिक तेंदुपाने संकलन करण्यासाठी जंगलात जात आहेत. त्यातच चामोर्शी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणार्या उपक्षेत्र जामगिरी कंपार्टमेंट नंबर ५३७ मध्ये तेंदुपाने तोडतांना मुक्ता नंदाजी कोडापे यांना जंगली डुकराने हल्ला (Attack) करून ठार केले. मुक्ता कोडापे यांना जखमी अवस्थेत चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र सदर महीलेला मृत घोषित करण्यात आले. याच घटनेत रविंद्रपुर येथील खगेन विष्णुपद मंडल (६०), वासुदेव कानई मंडल (४९ ) रा.रविंद्रपुर हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच विभागाने पंचनामा केला. मृतक महिला व जखमींना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.