मानोरा (Manora):- राज्यातील ग्रामीण भागात आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या उमेद अभियानाची मुदत येत्या काळात संपणार आहे. अभियानाचे अनन्यसाधारण योगदान लक्षात घेता सदर अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा नियमित भाग घोषीत करुन आस्थापनेला मान्यता देण्याची प्रलंबित मागणी पुर्ण करणेकरीता उमेद – महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने ८ जूलै पासून विधानसभेवर महामोर्चाचे आयोजन केले आहे.
जिल्हा व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे
ग्रामीण भागातील गरीबी निर्मुलन (Poverty alleviation) करुन महिलांचा सर्वांगिन विकास साधण्यासाठी केंद्र शासनामार्फ़त(Central Govt) दीन दयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात हे अभियान उमेद या नावाने राबविण्यात येत आहे. गावस्तरावर गरीब व जोखीमप्रवण आणि गरजू महिलांचे स्वयं सहाय्यता गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक(Farmers Producers) कंपन्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या गरीबांच्या संस्थामार्फ़त गरीबांना शाश्वत उपजीविकांचे स्त्रोत निर्माण केले जात आहे. अभियानाचा नियत कालावधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे या अभियानाशी जुळलेल्या लाखो संस्था, क्षमताबांधणी करणारे मनुष्यबळ व अभियानामुळे निर्माण झालेले हजारो कोटींचे वित्तीय जाळे मोडकळीस येण्याचा धोका आहे. राज्यकर्त्यांने हा धोका लक्षात घेवून अभियानाला नियमित दर्जा देण्याची संघटनेची अनेक वर्षापासूनची मागणी आहे.
८ जुलै रोजी मुंबई येथील विधानभवनावर महामोर्चाचे आयोजन
समुदायस्तरीय संस्था अधिक सक्षम होऊन कायमस्वरुपी टिकाव्यात यासाठी अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी, समुदाय संसाधन व्यक्ती यांची शासनातील नियमित आस्थापनेवरील पदे निर्माण करून सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी ग्रामविकास अंतर्गत उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभाग हा स्वतंत्र कायम विभाग स्थापन करण्यात यावा, अशी संघटनेची मागणी आहे. ही मागणी त्वरेने पुर्ण व्हावी याकरीता संघटनेकडून हा विषय शासनदरबारी मांडला जात आहे. राज्यकर्त्यांकडून त्याला अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने राज्याच्या हिताचा मुददा म्हणून येत्या ८ जुलै रोजी मुंबई येथील विधानभवनावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कंत्राटी कर्मचारी या महामोर्चात सहभागी होणार
या महामोर्चाकरीता मागील दोन महिन्यांपासून ग्रामपातळीपासून पुर्वतयारी सुरू होती. समुदाय संस्थाचे प्रतिनिधी, सर्व प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती, अभियानातील कंत्राटी कर्मचारी या महामोर्चात सहभागी होणार आहे. जिल्हयातील आंदोलनकर्ते दिनांक ७ जूलैपासून मुंबईकडे रवाना होत आहे. अभियानाला नियमित दर्जा देवून समुदाय संसाधन व्यक्ती , कंत्राटी कर्मचारी यांना कायम सेवेत घेण्याच्या मागणीला स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही सक्रियपणे पांठीबा दयावा, असे आवाहन तालुका , जिल्हा तसेच राज्य संघटना पदाधिकारी यांनी केले आहे.