Hinganghat :- महिलेसह मुलीचा उत्तरप्रदेशातून शोध घेत पोलिसांनी त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले. अल्लीपूर पाोलिसांनी ही कारवाई केली. तालुक्यातील अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत एक महिला, मुलीसह घरी न सांगता निघून गेल्याची तक्रार (complaint) नोंदविण्यात आली. त्यावरून ठाणेदार विजयकुमार घुले यांनी तपासाचे चक्र फिरवत माहिती घेऊन तत्काळ अल्लीपूर येथून पोलीस पथक शोधार्थ पाठविले.
अल्लीपूर पोलिसांची कार्यवाही
खात्रीलायक माहिती मिळताच अल्लीपूर पोलीस पथक थेट उत्तरप्रदेशात पोहोचले. त्यांनी तेथील पोलिसांच्या मदतीने आई व मुलीला ताब्यात घेतले. तेथून अल्लीपूरला परत आल्यावर अल्लीपूर येथे महिलेसह मुलीला कुटुंबियांना सोपविण्यात आले. त्यावेळी कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या होत्या. यावेळी पीडित कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांच्या तत्परतेने दहा दिवसाच्या आत आई व मुलगी सुखरूप घरी पोहोचले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहायक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार घुले, पोलिस अंमलदार अजय रिठे, जमादार रवी वर्मा, महिला पोलीस उमा कचाटे यांनी केली.