Pandharkawda :- केळापूर तालुक्यातील चनाखा येथील महिलांनी देशी दारुच्या (country liquor) दुकाना विरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यांनी गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनवर धडक देऊन निवेदन सादर केले आहे. या दुकानामुळे गावातील शांतता आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ग्राहक दारूच्या बाटल्या घेऊन अंगणवाडीच्या आवारात किंवा पारावर बसून दारू पितात
चनाखा गावात अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे दुकान अंगणवाडीला लागूनच आहे. त्यामुळे बाहेरगावावरून येणारे ग्राहक दारूच्या बाटल्या घेऊन अंगणवाडीच्या आवारात किंवा पारावर बसून दारू पितात. त्यानंतर रिकाम्या बाटल्या तिथेच टाकून जातात. या प्रकारामुळे अंगणवाडीत येणार्या लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, त्यांच्यासमोर एक चुकीचा आदर्श ठेवला जात आहे. या दारूच्या व्यसनामुळे (addiction)गावातील अनेक पुरुष आणि अगदी लहान मुलांनाही दारूचे व्यसन लागले आहे. दारू पिऊन भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे गावात अनेक अपघातही झाले आहेत.
याव्यतिरिक्त, दारूमुळे गावातील तीन लोकांचा मृत्यू (Deaths) झाल्याचा दावाही महिलांनी निवेदनाद्वारे केला आहे. या परिस्थितीमुळे गावात भीतीचे आणि असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या समस्येवर त्वरित तोडगा काढला नाही, तर भविष्यात आणखी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची शक्यता महिलांनी व्यक्त केली आहे. निवेदन देण्यासाठी गावातील अनेक महिलांनी पोलिस स्टेशनवर धडक दिली होती.