पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धा
अमरावती (Women’s Kabaddi Tournament) : शिक्षण महर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतोकत्तर रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत यजमान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या (Women’s Kabaddi Tournament) चुरशीच्या लढतीत पारुल विद्यापीठ वडोदरा या संघाने अमरावती विद्यापीठ संघाचा २३ विरुद्ध 30 असा सात गुणांनी पराभव केला. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात मैदानात उतरलेला अमरावतीचा संघ मध्यंतरापर्यंत १२ विरुद्ध ११ असा एका गुणांनी आघाडीवर होता. क्षणाक्षणाला या सामन्याचे पारडे एक दुसरीकडे झुकत होते.
चार अंतिम संघात उद्या रंगणार साखळी स्पर्धा
शेवटच्या दोन मिनिटापर्यंत अमरावती संघाने (Women’s Kabaddi Tournament) अल्पशी बडत मिळवली होती पण पारुल विद्यापीठाच्या खेळाडूंनी शेवटच्या काही मिनिटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अमरावती संघाला सात गुणांनी पराभूत केले. आणि प्रेक्षक गॅलरीत एकच सन्नाटा पसरला. हातात आलेला सामना अमरावती संघ गमावून बसल्याने पुढील फेरीत या संघाला प्रवेश करता आला नाही. पारुल विद्यापीठ संघातर्फे पलक आणि पनवर या खेळाडूंनी लाजवाब चढाई करत आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिले. अमरावती संघातर्फे अक्षता धानोरकर, मंजुळा पवार आणि पायल श्रीनाथ यांची उत्कृष्ट खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.
आजच्या सकाळच्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने जे पी जे टी झुंनझुनू विद्यापीठ संघाचा ३३ विरुद्ध ३२ असा केवळ एक गुणांनी प्रभाव करत विजय प्राप्त केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ बारा बारा गुण घेत बरोबरीत होते. या सामान्याने कबड्डीचा थरार काय असतो याची प्रचिती प्रेक्षक वर्गांना आणून दिली. दोन्हीही संघ अत्यंत तुल्यबळ होते. पण पुणे विद्यापीठ संघाने शेवटपर्यंत शांत डोक्याने खेळल्याने आणि शेवटच्या मिनिटात चढाई करत तब्बल तीन खेळाडूंना बाद करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पुणे विद्यापीठ संघातर्फे स्नेहा पावरा आणि कृष्णाई जाधव तर पारुल विद्यापीठातर्फे मुस्कान आणि तनु या खेळाडूंची खेळी सर्वोत्तम ठरली.
आतापर्यंत झालेल्या सामन्यात हा सामना फारच अटीतटीचा झाला. त्यानंतर झालेल्या सामन्यात नागपूर विद्यापीठ संघाने महाराजा गंगासिंग विद्यापीठ बिकानेर या संघाचा ४१ विरुद्ध बावीस असा १९ गुणांनी पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. नागपूर संघातर्फे श्वेता रत्नपारखी आणि साक्षी त्रिवेदी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. श्री बालाजी विद्यापीठ पुणे संघाने एकतर्फी सामन्यात राजस्थान विद्यापीठ जयपूर संघाचा ४३ विरुद्ध १८ असा २५ गुणांनी पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. पुणे विद्यापीठ संघातर्फे ज्योती डफळे आणि शुभदा खोत यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
आज सायंकाळच्या सत्रात श्री बालाजी विद्यापीठ पुणे विरुद्ध भारतीय विद्यापीठ पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विरुद्ध कोटा विद्यापीठ कोटा, आर टी एम नागपूर विद्यापीठ विरुद्ध मुंबई विद्यापीठ मुंबई तर पारुल विद्यापीठ वडोदरा विरुद्ध एस आर टी एम विद्यापीठ नांदेड या संघात सामने रंगणार आहे. यातील विजयी चार चमूचे साखळी फेरीचे सामने उद्या सकाळच्या सत्रात होणार असून यातून पहिले चार संघ निवडण्यात येईल. या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद लाभत असून स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा संयोजक डॉक्टर सुभाष गावंडे यांच्या मार्गदर्शनात गठीत केलेल्या विविध समित्याचे सभासद परिश्रम घेत आहे.