लातूर (Latur):- औसा ते आलमला या राज्यमार्ग क्रमांक २४२ चे काम अत्यंत निकृष्ट (Inferior) दर्जाचे होत असून या कामाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी व प्रवासी नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीत होत असलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. काळ्या मातीवरच मुरूम टाकून बेड तयार करत या नालीकामाचे कंत्राटदाराने बी ॲण्ड सी ला अक्षरश: ‘वेड’ लावले आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; शेतकरी व प्रवाशी, नागरिक त्रस्त!
लातूर तालुक्यातील चिंचोलीरावपासून लोहारा तालुक्यातील सास्तूरपर्यंत आलमला-औसा-नागरसोगा ते गुबाळ मार्गे हा राज्यमार्ग क्र. २४२ आहे. या राज्यमार्गाचे औसा उपविभागात जवळपास ८ कोटींचे १३०० मीटर लांबीच्या रस्त्याची सुधारणा करण्यात येत आहे. औसा शिवारात ओढ्यातून गेलेला हा रस्ता गेली अनेक वर्षे कच्चा रस्ताच राहिला. सार्वजनिक बांधकाम (Public works) विभागाने अखेर हा रस्ता निर्माण करण्याचे मनावर घेतले आणि या मार्गापैकी किमी २७/५०० ते २८/८०० ची सुधारणा सुरू झाली. ओढ्यातील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जवळपास ८०० फूट लांबीची व ३ फूट रुंदीची नाली तयार करण्याचे काम कंत्राटदाराला दिले. नाली तयार करण्यासाठी सोलींग, बेड असे काही न करता काळ्या मातीवरच मुरुम टाकून त्यावर सिमेंटीकरणात सळई टाकून बेड व नाली केली जात आहे. या ओढ्यात पाण्याचा प्रवाह मोठा असतो. किमान चार महिने तरी टिकेल, असेही हे काम नसल्याचे या रस्त्यावरुन ये-जा करणारे प्रवाशी, शेतकरी व ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र या कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्याला काम दर्जेदार होत असल्याचा ठाम विश्वास आहे.
शेतकरी काहीही म्हणतात, काम दर्जेदारच!
याबाबत कामावर देखरेख करणारे अभियंता एम. एम. पठाण यांना विचारले असता सेक्शनल इंजिनियर मुळजकर यांच्याकडे हे काम असल्याचे सांगितले. मात्र या कामावर देखरेख कोण करते, असे विचारल्यानंतर आपणच करतो, असे ते म्हणाले. नालीचे काम खाली मजबूत बेड करुन केले जात आहे, शेतकरी काहीही म्हणतात, असा दावाही त्यांनी केला.