शिरूर अनंतपाळ ग्रामीण रुग्णालय इमारतीला भाव; कर्मचाऱ्यांचाच अभाव!
शिरूर अनंतपाळ (Latur):- शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत दिमाखात उभी असून शहराच्या वैभवात भर टाकत आहे, मात्र इमारत सुसज्ज असली तरी या इमारतीत आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. परिणामी ‘शिरूरच्या ग्रामीण रुग्णालय इमारतीला भाव अन् कर्मचाऱ्यांचाच अभाव!’, असे म्हणण्याची वेळ शिरूर तालुक्यातील जनतेवर आली आहे. शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी एक्स-रे मशीन, सोनोग्राफी अशा अद्यावत सुविधा आरोग्य विभागाने उपलब्ध असल्या तरी या मशीन चालवण्यासाठी आरोग्य विभागाकडे (Department of Health) ऑपरेटरच नसल्याने या मशीन धूळ खात पडल्या आहेत.
शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले 2013 साली
पण सुसज्ज इमारतीचे बांधकाम मात्र पूर्ण झाले 2023 साली, ही शोकांतिका आहे. सध्या या रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व एक महिला डॉक्टर व तीन तज्ञ डॉक्टर असे 5 डॉक्टर आहेत. नर्सच्या 7 जागा मंजूर असून 3 नर्स कार्यरत आहेत तर 4 जागा रिक्त आहेत. 5 शिपायांची पदे मंजूर असून एकही शिपाई पद भरले नाही. त्यात डिलिव्हरी पेशंट दररोज एक-दोन तरी असतात. त्यामुळे लेडीज शिपाई नसल्याने डिलिव्हरीसाठी अडचणीचे होत आहे. या नवीन इमारतीमध्ये एक्सरे मशीन असून ऑपरेट करण्यासाठी टेक्निशियनचे पद भरले नाही. त्यामुळे रुग्णांना एक्सरेसाठी बाहेर जावे लागते. रक्त लघवी तपासणीसाठी कायमस्वरूपी प्रयोगशाळा नाही. ऑक्सिजन उपलब्ध आहे. मेडिसीन साठा पण पुरेसा आहे. पाणी पुरवठा पुरेसा आहे. फक्त एप्रिल महिन्यात बोअरचे पाणी कमी झाल्यास टँकरद्वारे पाणी घेतले जाते.
पदाच्या जागा रिक्त असल्याने आरोग्य सेवा कोलमडली जात आहे
निवासी डॉक्टरांना निवासस्थाने नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांना सेवा देण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. अबूलन्स एक उपलब्ध आहे, सोनोग्राफी मशीन आहे, पण ऑपरेट करण्यासाठी रेडिओलॉजिस्टची (radiologist) जागा भरली नाही.
डिलिव्हरी पेशंट व एक नातेवाईकांस डब्बा दिला जातो. एकंदरीत सर्व रुग्णालयात नर्स व सेवक या पदाच्या जागा रिक्त असल्याने आरोग्य सेवा कोलमडली जात आहे. अधीक्षक डॉ. पुरी यानी अशी माहिती दिली की, सर्व सुविधा उपलब्ध असून सुद्धा कर्मचाऱ्यांअभावी सेवा देणे जिकरीचे झाले आहे. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय शिरूर अनंतपाळ येथे रूम उपलब्ध आहे, अशी माहिती डॉ. पुरी यांनी दिली.
येरोळ आरोग्य केंद्रास इमारतच नाही
शिरूर अनंतपाळ तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र(Health Center) साकोळ व येरोळ येथे असून साकोळ येथे इमारत, ॲम्ब्युलन्स आहे. पण येरोळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास इमारत उपलब्ध नाही की डॉक्टरांना निवासासाठी निवासस्थान उपलब्ध नसल्याने त्याच उपकेंद्रात राहून रुग्णास सेवा दिली जाते. ग्रामीण रुग्णालयात दररोज 150 ते 180 पर्यंत बाह्यरुग्ण तपासणी व उपचार केले जाते. साकोळ येथील प्राथमिक 30 ते 40 बाह्य रुग्ण तपासले जातात तर येरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 25 ते 30 पेशंट तपासणी केली जाते.