हिंगोली/आजेगाव (Young man death) : वाशिम ते रिसोड मार्गावर हराळ फाटा शिवारात ४ जानेवारीला रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर उलटून सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील एका २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील अर्जून मदन भडके (२१) हा युवक ट्रॅक्टरवर काम करीत असताना ४ जानेवारी रोजी तो रिसोड येथे ट्रॅक्टर घेऊन गेला होता. रात्रीच्या सुमारास आजेगावकडे परत येत असताना वाशिम ते रिसोड मार्गावरील हराळ फाटा शिवारात ट्रॅक्टर उलटून रस्त्याच्या खाली पलटी झाल्याने त्यात अर्जून भडके हा ट्रॅक्टर खाली दबल्या गेला. (Young man death) अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्जूनला बाहेर काढून हिंगोलीतील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी आणले होते; परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. मयत अर्जून हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून त्यांच्या या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परीवार आहे.
दरम्यान, अर्जून भडके हा हिंगोली येथे मागील दोन वर्षापूर्वी मित्रासोबत चित्रपट पाहण्याकरीता आला होता. चित्रपट पाहून मोटार सायकलवरून गावाकडे जात असताना हिंगोली-सेनगाव मार्गावर राहोली फाटा येथे कारच्या (Young man death) अपघातात सोबत असलेल्या दोन्ही मित्राचा मृत्यू झाला होता तर अर्जून भडके हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जवळपास तीन महिने उपचार करण्यात आला होता; परंतु शनिवारी विदर्भातील हराळ येथे ट्रॅक्टर उलटल्याने त्याचा मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.