नागपूर (Chikungunya) : चिकुनगुनिया व डेंग्यू हे आजार संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. या दोन्ही आजारावर नेमका उपचार नाही. त्यामुळे डासांची ठिकाणे नष्ट करणे, डास चावणार नाही याची काळजी घेणे हेच आपल्या हाती आहे. या बाबी मोठ्यांना माहिती असतानाही (Chikungunya) चिकुनगुनिया व डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण तरुण वयातीलच आहे. चिकुनगुनियाचे ४५५ रुग्णांपैकी तब्बल २३८, तर डेंग्यूचा १०८ रुग्णांपैकी ४६ रुग्ण १६ ते ४५ वयोगटातील आहे.
एक डास माणसांची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो, याचा अनुभव चिकुनगुनिया व डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून नागपूरकर अनुभवत आहे. या दोन्ही आजारावर अॅण्टिबायोटिक किंवा अॅण्टिव्हायरल औषध नाही. विशेषतः डेग्यूचा आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. (Chikungunya) चिकुनगुनियामध्ये जिवाचा धोका कमी असला तरी आठवडे, महिने किंवा वर्षभर दुखण्यामुळे रोजचा जीवनावर प्रभाव पडू शकतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाचा आरोग्य विभाग आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहे.
मात्र, घराघरात या दोन्ही आजाराला कारणीभूत असलेली डासांच्या अळ्या (लारवा) दिसून येत आहे. त्याच घरातील तरुण मंडळी आजारी पडत आहे. त्यामुळे धोका वाढत असल्याचे हे चित्र आहे. नोंद झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आतापर्यंत पुरुष रुग्णांची संख्या ५६ असून, महिलांची संख्या ५२ आहे. दोन्हीमध्ये डेंग्यूचा विळखा जवळपास सारखाच असल्याचे दिसून येते.
डासाला प्रतिबंध हाच पर्याय: मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर
सणासुदीचे दिवस असल्याने मनपाचा आरोग्य विभाग सतर्क आहे. डेंग्यू व (Chikungunya) चिकुनगुनियावर नियंत्रण मिळविण्यासाठी घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. लारवा आढळून आल्यावर आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे. डासाला प्रतिबंध करणे हाच यावरील प्रभावी पर्याय आहे. सर्व महानगरपालिकेची दवाखाने व आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सोयी व औषधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.