कासारशिरसी/लातूर (Maratha Reservation) : आपण मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी भेटलो असून मराठा आरक्षणावर तिथेसुद्धा माझी भूमिका वेळोवेळी मांडली आहे. मी त्याच भूमिकेवर ठाम असून या भूमिकेत फरक दिसल्यास ‘तुमचा जोडा आणि माझे डोके’, असे उत्तर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (MP Omprakash Rajenimbalkar) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनकर्त्यांना दिले. निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथे औसा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत ६८ गावांसाठी खासदार राजेनिंबाळकर यांनी बुधवारी जनता दरबार घेतला. या दरबारात ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणा देत सकल मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते दाखल झाले.
खासदार राजेनिंबाळकर यांना भेटून मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) आपली व आपल्या पक्षाची भूमिका काय? अशी विचारणा केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीचे लेखी निवेदनही दिले. या प्रश्नाला उत्तर देताना खासदार ओमराजे (MP Omprakash Rajenimbalkar) यांनी सांगितले की, मी मराठा आरक्षणावर संसदेत अनेक वेळा प्रश्न मांडला आहे. माझी भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच असून माझा या मागणीला पाठिंबा आहे.
खासदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली
दरम्यान जनता दरबारातून बाहेर आलेल्या सकल मराठा कार्यकर्त्यांनी खासदारांवर नाराजी व्यक्त केली. ओबीसीतून आरक्षण देणार की नाही? त्याबाबत खासदारांची भूमिका स्पष्ट नसल्याने केवळ उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप (Maratha Reservation) आंदोलनकर्त्यांनी केला. २९ तारखेपर्यंत खासदारांनी त्यांची व त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, असेही म्हणाले.