परभणी (Parbhani):- आजची तरुणाई ही दिवसेंदिवस अंमली पदार्थांच्या(Narcotics) आहारी जात असल्याने त्यांचे आयुष्य उध्दवस्त होत आहे.आज जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनी विविध उपायोजना करुन या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
अंमली पदार्थांची तस्करी करणार्यांवर कडक कारवाई
राज्यभरात मागील काही दिवसांपासून पुण्यातील हिट अॅण्ड रन(Hit and run), सध्या सुरू असलेले ड्रग्स(drugs) प्रकरणामुळे अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होत असलेल्या घटनांची चर्चा होत आहे. त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून विविध कारवाया करत अंमली पदार्थांची तस्करी करणार्यांवर कडक कारवाई (action) करत आहे. तरीही शहरात बाहेरील जिल्ह्यातून अंमली पदार्थांचा पुरवठा करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. तरुणांमध्ये विविध अंमली पदार्थांचा नशेसाठी वापर करण्यात येतो. यामध्ये मुख्यत्वे मिथेट्रामाईन घटक असलेले टरमिन इंजेक्शन, गांजा, चरस, दारु याचा समावेश आहे.
कोरॅक्स सारख्या कफसिरप वर बंदी घातल्याने व विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने त्याचा वापर बंद
तर व्हाईटनर(Whitener), थिनर, सुलोचन, चमड्याच्या वस्तू (leather goods) पासून करण्यात येणारी नशा आधुनिक मेडिसनच्या उपलब्धतेमुळे कमी होत गेली आहे. तर कोरॅक्स सारख्या कफसिरप वर बंदी घातल्याने व विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने त्याचा वापर बंद झाला आहे. उपलब्ध असलेल्या नशेच्या विविध पदार्थांचा वापर करुन शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी नशा करण्यात गुंग आहेत. कमी वयात व्यसनाच्या आहारी जाण्याची कारणे ही त्यांच्या आसपास असलेली परिस्थिती ठरवित असते. यामध्ये आई – वडिलांचे मुलांकडे होत चाललेले दुर्लक्ष, मुलांना देण्यात येणारे अवाजवी स्वातंत्र्य, वसतिगृहांमध्ये राहणे, एखादी घटना मनासारखी न झाल्याने तणावाखाली येणे, एकत्रित कुटूंब पध्दतीचा होत चाललेला र्हास या कारणांचा समावेश आहे.
व्यसन हे कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नाही
कोणत्याही प्रकारचे व्यसन हे कुठल्याही परिस्थिती समर्थनीय ठरत नाही. तर व्यसन हे दिवसेंदिवस प्रतिष्ठा समजण्यात येत असल्याने संस्कारहीन तरुण पिढी त्याच्या आहारी जात आहे. यावर शासन, स्वयंसेवी संस्थांनी काम करणे गरजेचे आहे. – ज्ञानोबा मुंढे,
महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त.
अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे जिल्हाभरात ५५ व्यक्तींनी आत्महत्या केल्याची माहिती
जिल्हा रुग्णालयात ३३ रुग्णांवर समुपदेशन जिल्ह्यातील ३३ अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या रुग्णांवर समुपदेशन करण्यात येत आहे. यापैकी २२ रुग्ण हे समुपदेशनासाठी आवश्यक त्यावेळी प्रतिसाद देत असल्याने त्यांची पुढील काही दिवसांमध्ये या आहारी गेलेल्या व्यसनापासून मुक्तता होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.




