तिरोडा (Tiroda):- शेती करताना येणार्या अडचणी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी शेतीपासून दुरावत चालले आहेत. तर शेती म्हणजे ‘घाटे का सौदा’ अशीही भावना घर करू लागली आहे. परंतु, या सर्व बाबींना पुसून काढत मुंडीकोटा येथील नरेश चिंदु गजभीये या पदवीधर युवकाने नवा आदर्श स्थापित केला. रोजगाराच्या शोधात असलेल्या नरेशने नोकरीच्या मागे न धावता शेतीत प्रयोग करण्याच्या उद्देशाने एक एक शेतात काकडीचे उत्पादन घेऊन बेरोजगारीवर मात केली. त्याचा हा प्रयोग परिसरातील इतर शेतकर्यांकडून प्रेरणा देणारा ठरला आहे.
नरेश चिंदु गजभिये याची एम.एम पर्यंतचे शिक्षण घेवून पदवी
तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील नरेश चिंदु गजभिये याने एम.एम पर्यंतचे शिक्षण घेवून पदवी प्राप्त केली. रोजगाराच्या शोधात असलेल्या नरेशने नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु, त्याला यश आले नाही. यादरम्यान त्याने अनेक कामाची जबाबदारी पार पाडली त्यात अपयश आले. त्यांची परिस्थिती बेताची असताना आई वडीलाचे (parents) निधन झाले. त्यावेळी त्यांच्या समोर परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठे आव्हान उभे झाले. त्याने धीर न सोडता नोकरी (job) मिळेल, या आशेवर दिवस काढले. परंतु, त्यातही तो अपयशी ठरला. असे असतानाही तो खचला नाही आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे असलेल्या एका एकर शेतीत काय करता येईल यासाठी नरेश गजभिये याने कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अधिकार्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यानुरूप काकडी लागवड करण्याचा सल्ला मिळाला. हा सल्ला नरेशला पटला त्यांने आपल्या एका एकर शेतात काकडीची (Cucumber) लागवड केली. शेतात असलेल्या विहीरीच्या (well) मदतीने तो काकडीच्या शेतीला सिंचन करीत होता.
तसेच वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत होता. यात तो यशस्वी झाला. यंदा पहिल्याच वर्षी काकडीचे भरघोस उत्पादन झाले. काकडी विक्री करण्यासाठी त्याला बाजार पेठेत जाण्याची गरज नसून नागपुर येथील व्यापारी शेतात येऊन दोन हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे काकडी खरेदी करून घेऊन जातात. काकडीच्या शेतीतून नरेशने बेरोजगारीवर मात केली. त्याची ही कामिगरी परिसरातील युवक आणि शेतकर्यांसाठी (Farmer) आदर्श ठरली आहे.
पाच ते सहा जणांना रोजगार
एकेकाळी रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेला नरेश गजभिये यांनी शेतीत केलेला यशस्वी प्रयोग सार्थक ठरला आहे. यातून नरेशची बेरोजगारी (Unemployment) तर दूर झालीच शिवाय इतर पाच ते सहा जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. काकडीच्या वाडीची देखभाल करण्यासाठी दोन मजूर नियमीत काम करीत असून चार महीला मजूर दररोज काकडी तोडण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांना सुद्धा यातून रोजगार मिळत आहे.