सगळे तर्क, सगळे अनुमान, सगळेच ‘एक्झिट पोल’, ओपिनियन पोल’ एकसाथ पालथे पाडत यावेळच्या लोकसभा निवडणुकीने भारतीय मतदारांचा विवेक प्रचंड जागृत असल्याचे दाखवून दिले. यावेळची निवडणूक जनतेनेच हाती घेतली होती. राजकीय पक्षांना शहाणपणाचा धडा देण्याचे यावेळी जनतेनेच ठरविले होते. धर्म, आस्था, जात, द्वेष, अहंकार, अनैतिक राजकारण या सगळ्यांना इथल्या राजकारणात स्थान नाही, हेच यावेळी लोकांनी दाखवून दिले. निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या ‘चारसो पार‘ च्या नार्यातून भाजपचा अहंकार झळकत होता. हा अहंकार मतदारांना गृहीत धरण्याचा होता. देशाच्या याच मतदारांनी इंदिरा गांधींसारख्या नेत्यांनाही पराभूत केले होते, याचे विस्मरण भाजपच्या अहंकारी नेत्यांना झाले होते. जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मिरविणार्या भाजपने भारतात विरोधक शिल्लकच ठेवायचे नाही, या गुर्मीत राजकारण सुरू केले होते. भाजपच्या या अहंकाराला मतदारांनी झणझणीत चपराक लगावली आहे.
विरोधक बेरोजगारी, महागाई, संविधानाचे रक्षण अशा मुद्यांवर प्रचार करीत असताना भाजपने त्याकडे आपल्याच अहंकारात दुर्लक्ष करीत राममंदिर, मंगळसूत्र, मुस्लिम याच मुद्यावर भर दिला. सामान्य लोकांचे प्रश्न वेगळे होते, त्याला त्याची भूक महत्त्वाची वाटत होती, त्याला त्याचे अधिकार महत्त्वाचे वाटत होते, त्याला त्याची सुरक्षा महत्त्वाची वाटत होती, शेतकर्यांना त्यांच्या मालाला मिळणारे दाम महत्त्वाचे वाटत होते, या कशावरच भाजपचे नेते बोलत नव्हते. विरोधकांच्या प्रचार सभांना मिळणार्या प्रतिसादाची खिल्ली उडविली जात होती. हा अहंकारच भाजपला नडला. जागतिक नेते बनण्याच्या धुंदीत आपल्याच देशाच्या भूमिवर काय होत आहे, इथल्या सामान्य लोकांची काय गरज आहे, इथल्या शेतकर्यांच्या काय मागण्या आहेत, इथल्या तरूण लोकांना कशाची गरज आहे, या सगळ्याचा विसर पंतप्रधानांना पडला होता. विरोधकांना राजकीय लढाईत पराभूत करण्याऐवजी त्यांना राजकीय आयुष्यातूनच उठविण्याचे अतिशय घृणास्पद राजकारण करण्यात आले. त्याचा मोठा फटका महाराष्ट्रात बसला.
प.बंगालमध्ये संदेशखाली प्रकरणात ध्रुवीकरणाचे राजकारण तापविण्यात आले, त्याला तिथल्या मतदारांनी साफ नाकारले. केंद्रीय यंत्रणांचा वाटेल तसा दुरूपयोग करण्यात आला, त्याचेही पडसाद उमटले. काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी अतिशय मेहनतीने ही निवडणूक लढविली, मतविभाजनाचा भाजपला फायदा होऊ नये याची काळजी भाजपच्या द्वेषपूर्ण राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांनी घेतली. अर्थात उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, प.बंगाल या राज्यांनी भरपूर साथ दिल्यानंतरही मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ या भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लावण्यात विरोधकांना अपयश आले. दिल्ली, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड या राज्यातही भाजपने आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले, त्यासोबतच ओडिशामध्ये मोठे यश मिळविण्यात भाजप यशस्वी ठरली. त्यामुळे इतर राज्यात प्रचंड पडझड होऊनही भाजप २४०च्या आसपास जागा मिळविण्यात भाजपला यश आले. शिवाय उत्तरप्रदेशप्रमाणे बिहारमध्ये विरोधकांना अपेक्षित यश मिळाले नाही. आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडूंसोबत आघाडी करण्याचा भाजपचा निर्णय भाजपसाठी संकटमोचक ठरला.
भाजपने आपल्या आघाडीसह बहुमताचा आकडा तर ओलांडला, परंतु हे सरकार आता मोदींचे सरकार असणार नाही. कायम आपल्या अटींवर राजकारण करणार्या मोदींना आता आपल्या सहकारी पक्षांच्या अटींवर सरकार चालवावे लागणार आहे. नीतीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू िंकगमेकरच्या भूमिकेत आहेत. या दोघांनाही आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून नक्कीच होईल, परंतु त्यात तत्काळ यश मिळण्याची शक्यता कमीच आहे. असे असले तरी यावेळी मोदी सरकार तितके मजबूत असणार नाही. विरोधकांना दडपण्याची मग्रुरी आता दाखविता येणार नाही. हा भारताच्या लोकशाहीचा विजय आहे. हा इथल्या मतदारांच्या विवेकाचा विजय आहे. लोकशाहीच्या बुरख्याआड वावरणार्या तानाशाहांना संधी मिळताच रस्त्यावर आणण्याची ताकद या सामान्य मतदारांमध्ये आहे आणि त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. यावेळीही पुन्हा रालोआचे सरकार बनेल, यावेळीही पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, परंतु यावेळी सरकारची ती दादागिरी असणार नाही, सरकारच्या स्थिरतेवर कायम टांगती तलवार असेल. आपल्या मनात येईल तसे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य यावेळी मोदींना नसेल. खर्या अर्थाने लोकशाही सरकार यावेळी पाहायला मिळेल. या निवडणुकीने भाजप आणि मोदींना जोरदार झटका दिला यात वाद नाही, परंतु शेवटी जीवावर आलेले संकट बोटावर निभवून नेण्यात मोदी यशस्वी झाले.