उत्पादन खर्चात मात्र पाच पटीने झाली वाढ
गडचिरोली (Paddy Price) : केंद्र शासनाने २०२५-२६ च्या खरीप पणन हंगामासाठी धानासह प्रमुख १३ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे.यामध्ये धानाच्या आधारभूत किमतीत ६९ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे गेल्या २२ वर्षात धानाच्या हमीभावात केवळ १८१९ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्या तुलनेत (Paddy Price) धान शेतीच्या उत्पादन खर्चात पाच पटींनी वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन हे पूर्व विदर्भातील गडचिरोलीसह पाच जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे १ लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आहे. धानाच्या लागवड खर्चात दरवर्षी वाढत होत असून त्या तुलनेत (Paddy Price) धानाला मिळणार दर हा फारच कमी असल्याने धानाची शेती म्हणजे शेतकर्यांसाठी तोट्याचा सौदा झाला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२४-२५ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात १८३ रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे गेल्यावर्षी (Paddy Price) धानाला प्रति क्विंटल २३०० रुपये हमीभाव मिळाला. सन २०२५-२६ करिता कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारने धानाला ४७८३ रुपये हमीभाव मिळण्याची शिफारस केला होतीे; पण प्रत्यक्षात अल्प प्रमाणात वाढ झाली आहे. सन २००४ ते २०२५ पर्यंतच्या धानाच्या हमीभावावर नजर टाकल्यास त्यात केवळ १८१९ रुपयांची वाढ झाली आहे. पण त्या तुलनेत शेतीच्या लागवड खर्चात पाचपट वाढ झाली आहे.
खते, बियाणे, मजुरी व इतर खर्चात भरसाठ वाढ झाली आहे. २० वर्षापूर्वी (Paddy Price) धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च १२ ते १३ हजार रुपये होता तो आता २२ ते २५ हजारांवर पोहचला आहे, पण त्यातुलनेत हमीभाव मिळत नसल्याने धानाची शेती करावी कशी असा विकट प्रश्न धान उत्पादक शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च २२ ते २५ हजार रुपये आहे. तर एकरी १५ ते १८ क्विंटल धानाचे उत्पादन होते. सर्व खर्च जाता शेतकर्यांच्या हातात केवळ तीन ते चार हजार रुपये शिल्लक राहतात. यामध्ये शेतकर्यांनी कुटुंबासह शेतीसाठी केलेली मेहनत व मजुरी जोडल्यास त्यांच्या हाती काहीच पडत नाही.
धानाची आधारभूत किंमत २३६९ रूपये होणार
२०२५-२६ च्या खरीप पणन हंगामासाठी भातासह १३ प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली. सामान्य प्रकारच्या (Paddy Price) धानाची किमान आधारभूत किंमत आता प्रतिक्विंटल २,३६९ रुपये असेल. ग्रेड-ए भाताची किमान आधारभूत किंमत २,३८९ रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, इतर खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीतही वाढ करण्यात आली आहे. नाचणीच्या किमान आधारभूत किमतीत ५९६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कापसाच्या किमतीत ५८९ रुपये आणि तिळाच्या किमतीत ५७९ रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, तूरडाळीच्या किमान आधारभूत किमतीत ४५० रुपये आणि उडदाच्या किमतीत ४०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.