रेल्वे स्टेशनवरील बंदोबस्ताचा पोलिसांनी घेतला आढावा
हिंगोली (Hingoli Ramlalla Train) : ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या जेष्ठ नागरीकांना राज्य आणि भारतातील तिर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना’ सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली असुन, त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी हिंगोली जिल्ह्यातील ८०० भाविकांची निवड झाली असुन हे भाविक आज शनिवार १९ एप्रिल रोजी (Hingoli Ramlalla Train) रेल्वेने अयोध्येला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत. त्या दृष्टीने पोलिस व रेल्वे पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना जाहीर केली होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने या योजनेची अंमलबजावणी केली जात असुन १४ जुलै ते १५ ऑक्टोंबर २०२४ या दरम्यान सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाकडे ६० वर्षावरील वयोवृध्द नागरीकांचे प्रस्ताव मागिविले होते. त्यासाठी जवळपास २५०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. ज्यामध्ये अयोध्या येथे तिर्थदर्शनाचे जवळपास १५०० प्रस्ताव आले होते. १९ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेतल्यानंतर ८०० भाविकांची (Hingoli Ramlalla Train) अयोध्या दर्शनासाठी निवड केली होती.
आज १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे क्रमांक ००७१९ यामधून ८०० भाविक अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत. ही रेल्वे २० एप्रिलला रात्री ८ वाजता अयोध्या येथे पोहचणार आहे. परतीच्या प्रवासात ही रेल्वे सोमवारी २१ एप्रिलला रात्री ११ वाजता (Hingoli Ramlalla Train) अयोध्या येथून निघणार असुन २३ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता हिंगोलीत पोहचणार आहे. रेल्वेच्या १२ बोगीमध्ये प्रत्येक बोगीतील भाविकांच्या सोयीसाठी एक कर्मचारी व सात जणांचे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
आज ८०० भाविक अयोध्येला रवाना होणार असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे यांची बंदोबस्त अधिकारी म्हणुन नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह पोलिसांचे ८ अधिकारी ४० पोलिस कर्मचारी एक दंगल नियंत्रण पथक तसेच आरपीएफचे पुर्णा रेल्वे सुरक्षा बल, पोलिस निरीक्षक एस.पी. पासवान यांच्यासह १५ जवान आणि जीआरपीचे एक अधिकारी व तीन जवान तैनात करण्यात आले आहेत. या (Hingoli Ramlalla Train) भाविकांना रवाना करताना त्यांच्या नातेवाईकांचीही मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.