Darwah :- सकल आदिवासी समाज नियोजन समितीच्या वतीने सोमवारी दारव्हा शहरात अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या रक्षणासाठी एक भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ‘एक तीर, एक कमान — सारे आदिवासी एक समान’ या घोषवाक्याने दुमदुमलेल्या या मोर्चात हजारो आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एसटी आरक्षणात इतर समाजांच्या घुसखोरीविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.
‘एक तीर, एक कमान — सारे आदिवासी एक समान’ च्या घोषणा
मोर्चात आदिवासी समाजाने (Tribal community) शासनाला पाठविलेल्या निवेदनात ठाम मागणी केली की, एसटी आरक्षण केवळ मूळ आदिवासी समाजासाठीच राखीव ठेवावे आणि त्यात इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये. दुपारी २ वाजता शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्चात ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक आदिवासी वेशभूषा, तीर-कमान आणि फासे जाळे यांच्यासह आदिवासी बांधवांनी आपली सांस्कृतिक परंपरा आणि ऐक्य दाखवले. विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आणि त्यांचे पारंपरिक नृत्य, गाणी आणि लोककला यांनी मोर्चाला अनोखी रंगत आणली.
मोर्चात गोंड, कोरकू, मादिया, कोलाम, भिल्ल आदी जमातींचा उत्साहपूर्ण सहभाग होता. पारंपरिक पोशाख, ढोल-नगार्यांच्या तालावर नाचणारे युवक-युवती आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य यांनी मोर्चाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले.मोर्चाच्या समारोपात समितीच्या पदाधिकार्यांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर करून ‘एसटी आरक्षणावर कोणाचाही डोळा खपवून घेतला जाणार नाही. ही आमच्या अस्तित्वाची, अस्मितेची आणि हक्कांची लढाई आहे. घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास आम्ही शांत बसणार नाही.’ असा इशारा दिला.