गडचिरोली (Gadchiroli) :- जिल्ह्यात अपघाताचे (Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याचा प्रश्न दैनिक देशोन्नतीने सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांना विचारला असता त्यांनी येत्या १५ दिवसात अपघात नियंत्रणासाठी जिल्ह्यात पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करण्यात येत असल्याची माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग पोलीस यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही ना. जयस्वाल म्हणाले. येथील जि. प. सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत (Press conference) ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. मिलिंद नरोटे, आ. रामदास मसराम, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे उपस्थित होते.
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे लोहखनिजाच्या वाहतुकीची वर्दळ वाढली
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे लोहखनिजाच्या वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. यात लोह खनिज वाहतूक (Transport of iron ore) करणारे टिप्पर चालक हे बेधुंद वाहन चालवत असल्यामुळे अपघातात अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात असल्याचे दै. देशोन्नतीने ना. जयस्वाल यांच्या निदर्शनास आणून देताच याबाबत आपण जिल्हा व राज्यातील पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकार्यांसोबत चर्चा केली असून येत्या १५ दिवसात पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करण्यात येणार असल्याचे ना. जयस्वाल म्हणाले.शहरातून होणार्या अवजड वाहनांच्या वाहतुकी संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ना. जयस्वाल यांनी गडचिरोली शहरातून वाहतूक वाळविण्यासाठी स्वतंत्र बायपास रोडची निर्मिती करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचेही सांगितले.
जिल्ह्यात उत्पादकता वाढवायची असून प्रत्येक स्त्री व पुरुषांच्या हाताला काम द्यायचे आहे. विकसित जिल्हा म्हणून पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ना. जयस्वाल म्हणाले.