Aarni :- पीक कर्जासाठी बँकेला शेतीचे मूल्यांकन सादर करावे लागते. दुय्यम निबंधक कार्यालयातून मूल्यांकन (Evaluation) पत्र दिले जाते मात्र मूल्यांकन प्रमाणपत्र मिळवताना शेतकर्यांना शंभर रुपयाची चलान असताना दीडशे रुपये मोजावे लागत असल्याचा प्रकार आर्णी तहसीलच्या दुय्यम निबंधक कार्यालयात समोर आला.
शेतकर्यांनी तहसीलदाराकडे केली तक्रार
या संदर्भात तालुक्यातील लोणी येथील शेतकर्याने ऑपरेटर विरोधात लेखी तक्रार १८ सप्टें रोजी दाखल केली आहे. मूल्यांकन चलान काढण्यासाठी संबंधित ऑपरेटरने अर्जदारांकडून प्रत्येकी १५० रुपये आकारत असून, प्रत्यक्ष चलान केवळ १०० रुपयांत निघत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक अर्जावर ५० रुपयांची जादा वसुली होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे शेतकर्यांना जादा पैसे मोजावे लागत आहे. आर्थिक नुकसान होत असून, तालुक्यातील सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, विशेष म्हणजे तहसील परीसरात हाकेच्या अंतरावर असा प्रकार घडत आहे. त्यामुळे याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित ऑपरेटरवर (operator) कारवाई करावी, तसेच पुढे नागरिकांकडून जास्तीचे पैसे आकारले जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे, शेतकर्यांच्या हितासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.