मलकापूर गणेश विसर्जन

श्री गणेश विसर्जनासाठी मलकापूर शहर पोलिसांचे आवाहन

Malkapur Ganesh Visarjan: श्री गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यासाठी मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळे तसेच नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना..

श्री गणेश विसर्जनासाठी मलकापूर शहर पोलिसांचे आवाहन

Malkapur Ganesh Visarjan

 

शांतता, शिस्त आणि सुरक्षिततेला प्राधान्य; गणेश मंडळे व नागरिकांनी १३ सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

मलकापूर (Malkapur Ganesh Visarjan) : श्री गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यासाठी मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळे तसेच नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिरवणुकीसाठी महत्त्वाच्या सूचना

१. ड्रोन व इतर उपकरणांवर निर्बंध:
गणेश मंडळे किंवा सामान्य व्यक्तींनी विसर्जन मिरवणुकीमध्ये स्वयंशासित किंवा दूरनियंत्रित पद्धतीने उडणारे ड्रोन अथवा तत्सम उपकरणे पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय वापरू नयेत.

२. ज्वलनशील पदार्थांना मनाई:
रॉकेल, पेट्रोल, डिझेल अथवा इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थांचा वापर करून खेळ किंवा प्रात्यक्षिके मिरवणुकीमध्ये सादर करू नयेत.

३. फटाके व ज्वलनशील पदार्थ:
धार्मिक स्थळांच्या ५० मीटर परिसरात फटाके अथवा ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

४. ध्वनिक्षेपकाचा मर्यादित वापर:
प्रार्थना अथवा नमाज सुरू असताना मोठ्या आवाजाची वाद्ये, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करू नये.

५. धोकादायक शस्त्रे अथवा वस्तूंचे प्रदर्शन नको:
मैदानी खेळांचे प्रदर्शन किंवा प्रात्यक्षिके सादर करताना दर्शकांना इजा होईल अशी कोणतीही कृती करू नये. विशेषतः धारदार शस्त्रे, टोकदार वस्तू किंवा शरीराला इजा होण्याची शक्यता असलेल्या वस्तूंचा वापर टाळावा.

६. मंडळांमध्ये वाद टाळा:
एका गणेश मंडळाने दुसऱ्या मंडळाच्या मिरवणुकीत जाऊन वाद किंवा भांडण निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

७. धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृतींना मनाई:
कोणत्याही समाजाच्या धार्मिक अथवा जातीय भावना दुखावतील अशी गाणी, घोषणा, हावभाव किंवा अन्य कोणतीही कृती करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

८. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना सहभागी करून घेऊ नका:
प्रतिबंधित व्यक्ती, तडीपार व्यक्ती किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी करून घेऊ नये.

९. पोलिसांनी निश्चित केलेल्या क्रमवारीचे पालन:
गणेश मंडळांनी स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या क्रमवारीनुसारच मिरवणुकीत प्रवेश करावा.

१०. दारू अथवा अमली पदार्थांना पूर्णपणे मनाई:
कोणत्याही व्यक्तीने दारू अथवा अमली पदार्थांचे सेवन करून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ नये.

११. निश्चित केलेल्या विसर्जनस्थळीच विसर्जन:
गणेशमूर्तींचे विसर्जन प्रशासनाने निश्चित केलेल्या विसर्जन स्थळी आणि निर्धारित वेळेतच करावे.

१२. ध्वनिक्षेपकासाठी नियमांचे पालन:
ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकांचा वापर प्रशासन तसेच मा. न्यायालयाने निश्चित केलेल्या नियमांनुसार, निर्धारित ध्वनिमर्यादा आणि निर्धारित वेळेतच करावा.

१३. पोलिस प्रशासनास सहकार्य:
गणेश मंडळांनी पोलीस व प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

शांतता, शिस्त आणि सुरक्षिततेला प्राधान्य

गणेश विसर्जन उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मलकापूर शहर पोलीस ठाणे, बुलढाणा जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“शांतता, शिस्त, सुरक्षितता” या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गणेश विसर्जन उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.