वाढदिवसाच्या शुभेच्छा, ऑफिस अपडेट्स आणि महत्त्वाचे रिमाइंडर पाठवण्यासाठी नवी सुविधा; मेसेज शेड्यूल करण्यापासून डिलीट करण्यापर्यंत सर्व पर्याय उपलब्ध.
नवी दिल्ली : व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. एखाद्याला ठरावीक दिवशी किंवा वेळेत मेसेज पाठवायचा असेल, तर आता तो वेळेआधीच सेट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपने २५ नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत 'X' अकाऊंटवर टीजर शेअर करत बहुप्रतीक्षित 'मेसेज शेड्यूलिंग' फीचरची घोषणा केली आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा महत्त्वाचे संदेश पाठवण्यासाठी ठरलेल्या वेळी स्वतः ऑनलाइन राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे, एकदा संदेशासाठी तारीख आणि वेळ निश्चित केली की, संबंधित वेळी तो आपोआप पाठवला जाईल. त्यासाठी वापरकर्ता ऑनलाइन असणे किंवा त्या क्षणी फोन इंटरनेटला जोडलेला असणे आवश्यक नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वैयक्तिक संवादापासून व्यावसायिक कामकाजापर्यंत अनेक गोष्टी सोप्या होण्याची अपेक्षा आहे.
व्हॉट्सॲपवर मेसेज शेड्यूल कसा करायचा?
अँड्रॉइड आणि आयओएसवरील निवडक बीटा वापरकर्त्यांकडे या सुविधेची चाचणी घेतल्यानंतर कंपनीने आता टप्प्याटप्प्याने ती इतर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. मेसेज शेड्यूल करण्यासाठी पुढील प्रक्रिया करता येईल.
१. Send बटण दाबून ठेवा
सर्वप्रथम संबंधित व्यक्तीची किंवा ग्रुपची चॅट उघडा. त्यानंतर पाठवायचा मजकूर लिहा किंवा फोटो अथवा व्हिडिओ जोडा. पुढे मेसेज पाठवण्यासाठी असलेले 'Send' बटण काही सेकंद दाबून ठेवा.
२. तारीख आणि वेळ निश्चित करा
सेंड बटण दाबून ठेवल्यानंतर स्क्रीनवर मेसेज पाठवण्याची तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय दिसेल. त्यामध्ये १० मिनिटांनंतरपासून पुढील दोन आठवड्यांपर्यंतची वेळ निश्चित करता येईल.
३. शेड्यूल केलेले मेसेज तपासा
पाठवण्यासाठी निश्चित केलेले संदेश संबंधित चॅटच्या 'Info' म्हणजेच माहिती विभागातील स्वतंत्र सेक्शनमध्ये पाहता येतील. त्यामुळे कोणते मेसेज पाठवायचे बाकी आहेत, याची माहिती वापरकर्त्याला मिळेल.
४. मेसेज डिलीट करण्याचीही सुविधा
शेड्यूल केलेला संदेश पाठवण्याची वेळ येण्यापूर्वी तो रद्द किंवा डिलीट करता येईल. विशेष म्हणजे, असा मेसेज डिलीट केल्यास समोरच्या व्यक्तीला त्याबाबत कोणतेही नोटिफिकेशन जाणार नाही.
कोणते मेसेज शेड्यूल करता येणार?
या सुविधेच्या माध्यमातून केवळ साधे टेक्स्ट मेसेजच नव्हे, तर वेब लिंक्स, फोटो आणि व्हिडिओदेखील ठरावीक वेळेसाठी शेड्यूल करता येतील. मात्र, सध्या पीडीएफ फाइल किंवा इतर प्रकारची डॉक्युमेंट्स शेड्यूल करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे.
ग्रुप चॅटसाठी काय असणार नियम?
ग्रुपमध्ये मेसेज शेड्यूल करताना सदस्यांबाबत एक महत्त्वाची अट लागू असेल. ज्या वेळी संदेश शेड्यूल केला जाईल, त्या क्षणी ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांनाच संबंधित मेसेज दिसणार आहे. त्यानंतर ग्रुपमध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांना आधीच शेड्यूल केलेला संदेश दिसणार नाही.
वाढदिवसापासून ऑफिसच्या कामापर्यंत होणार उपयोग
या नव्या सुविधेमुळे दैनंदिन संवाद अधिक नियोजनबद्ध करता येणार आहे. रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवणे, कार्यालयीन सूचना देणे, महत्त्वाच्या कामांची आठवण करून देणे किंवा सण-समारंभाच्या शुभेच्छा योग्य वेळी पोहोचवणे शक्य होईल.
व्हॉट्सॲपकडून हे फीचर टप्प्याटप्प्याने जारी केले जात असल्याने सर्व वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये ते एकाच वेळी दिसेलच असे नाही. त्यामुळे सध्या ज्यांना हा पर्याय उपलब्ध झालेला नाही, त्यांना आगामी अपडेटमध्ये ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे.