अतिवृष्टी थांबेना; पूरप्रलयाने जिल्हा जलमय!
लातूर (Latur Heavy Rain) : लातूर जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित पर्जन्यमानाच्या (663.8 मिमी) तुलनेत 783.0 मिमी म्हणजेच 118.0 टक्के इतका पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.00 मिमी च्या तुलनेत आजतागायत 783.0 मिमी म्हणजेच 110.9 टक्के इतक्या (Latur Heavy Rain) पावसाची नोंद झाली आहे.
रात्रभर जागली गावे; शासकीय यंत्रणा ठरली कूचकामी
दिनांक 22/09/2025 रोजी लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 35.3 मिमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत (138.8 मिमी सरासरी) प्रत्यक्षात 224.5 मिमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात अपेक्षित सरासरीच्या तब्बल 165 टक्के (Latur Heavy Rain) पाऊस झाला असून अजूनही पाऊस कोसळतच आहे. दरम्यान सोमवारी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी रात्रभर जागून आपली सुरक्षा करून घेतली. आपत्कालीन परिस्थितीत कुठेही शासकीय कर्मचारी अधिकारी किंवा यंत्रणा मदतीसाठी नसल्याने गावोगाव ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
सप्टेंबर महिना संपला अजून सात दिवस शिल्लक आहेत. विशेष म्हणजे सरकार पातळीवर मे महिन्यात पडलेल्या पावसाची कुठेही नोंद घेतली गेली नाही. लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा या दोन तालुक्यांमध्ये तेरणा नदीच्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे. औसा तालुक्यातील व निलंगा तालुक्यातील तेरणा नदीकाठच्या गावामध्ये लोकांनी अक्षरशा रात्रही जागून काढली. महापुराचे भेसुर चित्र समोर उभे राहिल्याने या पुरातून आपले काही शिल्लक राहील का? असा केला प्रश्न गावोगाव उपस्थित केला जात आहे. अशा कठीण प्रसंगात लोकप्रतिनिधी प्रशासन मदतीचा नसल्याने ग्रामस्थांमधून संतापही व्यक्त करण्यात आला.
माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी (Latur Heavy Rain) नियंत्रित करण्याचे दृष्टीने मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे आणखी 2 द्वारे हे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या एकूण 8 वक्रद्वारे 50 सेंटीमीटर ने व 4 वक्रद्वारे 1 मीटरने चालू असून एकूण 29937 क्यूसेक्स (847.75) क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे. यामुळे तेरणा नदीकाठच्या गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. तेरणा नदीकाठचा परिसर झालं का दुसऱ्या दिवशीही जलमय झाला असून खरीप पिके नामशेष झाली आहेत. उभा ऊस आडवा झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
औसा तालुक्यातील मंगरूळ येथे तेरणा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीची निलंगा अग्निशमन दलाच्या शोध व बचाव पथकाने सुखरूप सुटका केली. दरम्यान उजनी येथे तेरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूरकडून औसाकडे येणाऱ्या मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर एक लेनवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने मंगळवारी सकाळी 9.30 वाजता धरणाचे सहा दरवाजे 0.25 मीटरने उचलण्यात आले आहेत. सध्या मांजरा नदीपात्रात 55113.30 क्युसेक्स (1560.84 क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे.
आलमला उजनी ग्रामस्थांनी रात्र जागून काढली
1998 नंतर प्रथमच तावरजा नदीला मोठा पूर आला. तावरजा मध्यम प्रकल्पाचे 22 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने नदीला महापूर आला. नदीच्या जवळपास दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतरात पुराचे पाणी वाहिले. ग्रामस्थांनी यामुळे रात्र जागून काढली. अतिवृष्टीमुळे गाव शिवारातील सर्व खरीप शेती वाया गेली आहे. औसा तालुक्यातील उजनी येथे तेरणेला महापूर आला. महापुराचे पाणी गावात शिरल्याने उजनीकरांचे मोठे हाल झाले. अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ग्रामस्थांनी रात्र जागून महापुरापासून लोकांच्या बचावासाठी परिश्रम घेतले. अतिवृष्टीमुळे परिसरातील खरीप पिके वाया गेली आहेत.




