लातूर (Achievement Award) : देवणी तालुक्यातील गुरधाळ येथील मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सह अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 18 मे रोजी लातूरच्या दयानंद सभागृहात होणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव वसंत घोगरे पाटील यांनी दिली.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भागवताचार्य पंडित रमाकांत व्यास, खासदार शिवाजी काळगे, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, सुप्रसिद्ध गायक डॉ. अंबरीश महाराज देगलूरकर यांची उपस्थिती राहणार आहे. याच सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्यांना (Award Winners) मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने (State Level Award for Human Development) सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. सरोजा घोगरे पाटील यांनी केले आहे.
हभप गहिनीनाथ महाराज (Habhap Gahininath Maharaj) यांच्या वारकरी संप्रदाय, अध्यात्म व सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मानव विकास संस्थेने यापूर्वी डॉ. जनार्दन वाघमारे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना मानव सेवा पुरस्काराने सन्मानित केले आहे.