नववर्षात सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना घालणार साकडे
लातूर (Latur University) : आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्यावतीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षापासून लावून धरलेली असून नववर्षात सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना कृती समिती भेटून विद्यापीठाचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी करणार आहे.
कृती समितीच्या वतीने ॲड. प्रदीपसिंह गंगणे यांनी माहिती देताना सांगितले की, (Latur University) लातूरकराच्या मागणीतून लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून २००७ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपकेंद्र पेठ लातूर येथे सुरु करण्यात आलेले आहे. लातूर जिल्हयातंर्गत कला, वाणिज्य, विज्ञान ,औषधनिर्माण शास्त्र, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित ३६ महाविद्यालय,कायम विनाअनुदानित ८० असे एकूण ११६ महाविद्यालय आहेत. त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या ५५,४१० आहे. या प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरूप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालकांना नांदेडला पायपीठ करावी लागते आहे तर शेजारच्या सोलापूर जिल्हयासाठी महाविद्यालयांची संख्या १०९ असताना विद्यार्थी, पालक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी २०१४ मध्ये स्वतंत्र विद्यापीठ शासनाने दिलेले आहे.
कृती समितीचे आवाहन
याबाबत (Latur University) विद्यापीठ निर्माण कृती समितीने अनेक मान्यवर नेत्यांना, अधिकाऱ्यांना भेटून निवेदने देत वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र अद्याप शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आक्रमक होत या प्रश्नासाठी पाठपुरावा करणार असून यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य संयोजक ॲड. प्रदिपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर, बालाजी पिंपळे, धनराज जोशी, सुनिल खडबडे, अजयसिंग राठोड, लहू जाधव, प्रा. संगमेश्वर पानगावे, अँड सुहास बेंद्रे, डॉ. अंबादास कारेपूरकर, दिगंबर कांबळे, अतिश नवगिरे आदींनी केली आहे.