Wardha MD news :- कारमधून मेफेड्रॉन ड्रग्जसह (Mephedrone drugs) गांजा अंमली पदार्थाची वाहतूक करणार्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ड्रग्ज, गांजासह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत सात लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलिंग (Patrolling) करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुनापाणी चौरस्ता पिपरी (मेघे) येथे सापळा चरला. यावेळी सराईत गुन्हेगार राजेंद्रसिंग उर्फ गुड्डु लखनसिंग जुनी रा. गिरीपेठ पिपरी (मेघे), त्याचा साथीदार कुणाल नारायणस्वामी अल्पवार, रा. स्वागत कॉलनी डाफे लेआऊट पिपरी (मेघे) या दोघांवर एन.डि.पी.एस. अॅक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता, दोन्ही आरोपी संगनमताने मेफेड्रॉन (एम.डी.) व गांजा अंमली पदार्थाची कारने वाहतूक करताना मिळून आले. या अंमली पदार्थांचा पुरवठा लड्डू गिराड रा. स्वामीनारायण मंदिर जवळ वाठोडा नागपूर याने केल्याचे निष्पन्न झाले. मिळून आलेल्या आरोपींच्या ताब्यातून ६ ग्रॅम मेफेड्रॉन (कि. २१,००० रू.), ३०० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ (कि. ५,८८० रू.), एक मोबाईल, एम.एच. २९ ए.बी. ७११७ क्रमांकाची कार असा ७ लाख ४१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही आरोपींविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, दिनेश बोथकर, मिथुन जिचकार, दिपक साठे, अभिषेक नाईक, फॉरेन्सिक विभागाचे अनिल साटोणे, मंगेश धामंदे यांनी केली.