सीईओंकडे तक्रार: बदलीसाठी 15 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा!
लातूर (Adarsh Gav Yojana) : आदर्श गाव योजनेअंतर्गत लातूर तालुक्यातील खुंटेफळ येथील बळीराजा कृषी विज्ञान केंद्राने माटेफळ गावाची निवड केली आहे. या गावात बचत गट व ग्राम संघांना निधी तसेच अनुदान देण्याची योजना या केंद्रामार्फत राबविण्यात येत असून, या आदर्श गाव योजनेला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियानातील प्रभाग समन्वयक विश्वेश्वर क्षीरसागर हे जाणीवपूर्वक खोडा घालत असल्याची तक्रार (Complaint) करीत या प्रभाग समन्वयकाची तात्काळ बदली करा; अन्यथा 15 ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खुंटेफळ येथील बळीराजा कृषी विज्ञान मंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.
प्रभाग समन्वयकाची तात्काळ बदली करावी!
लातूर तालुक्यातील माटेफळ हे गाव आदर्श गाव योजनेसाठी निवडण्यात आले आहे. त्यानुसार या गावात बळीराजा कृषि विज्ञान मंडळा (Baliraja Agricultural Science Board) मार्फत विविध विकास कामे केली जात आहेत. या योजनेचा एक भाग महिला व पुरुष यांच्या 32 बचत गटांना प्रत्येकी 25000/- रु. निधी वाटप करून महिलांचे व्यवसाय उभे करणे हा आहे. तसेच ग्रामसंघास 1,82,000/- अनुदान व मोठ्या दोन बचत गटांना प्रत्येकी 1,00,000/- रुपये अनुदान देण्याचे प्रयोजन आहे. मात्र या गावातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियानातील प्रभाग समन्वयक विश्वेश्वर क्षीरसागर यांनी गावातील सीआरपी यांच्यावर दबाव टाकून या योजनेत सहभागी होऊ नका, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे गाव आदर्श बनवण्यासाठी खोडा निर्माण होत असून, अशा प्रभाग समन्वयकाची तात्काळ बदली करावी अन्यथा 15 ऑगस्ट पासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा मंडळाच्या अध्यक्षांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, अधीक्षक कृषी अधिकारी व लातूरचे गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.