हिंगोली (MLA Santhosh Bangar) : जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील एका कार्यकर्त्याच्या मुलीला अकोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डिपॉझिट भरले नसल्याने व्हेंटिलेटर वर ठेवले जात नव्हते त्यामुळे आमदार संतोष बांगर (MLA Santhosh Bangar) यांनी संबंधित डॉक्टरास भ्रमणध्वनीवर चांगलेच खडसावले तर आता छत्रपती संभाजीनगर येथे डेंग्यूच्या रुग्णाचे दहा दिवसाचे औषधीच्या खर्चासह रुग्णालयाचे असे सहा लाख रुपयांचे देयक मागणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला आमदार संतोष बांगर (MLA Santhosh Bangar) यांनी चांगलेच फटकारले.
राज्यात सध्या रुग्णालयामधून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागली आहे. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी सुरूच असून या प्रकारात कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. चॅरिटेबल रुग्णालयाकडूनही पिळवणूक होत असल्याने सर्वसामान्य तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच काही खाजगी रुग्णालयात देखील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.
त्याचाच प्रत्यय कनेरगाव नाका येथील एका व्यक्तीला आला सदरील व्यक्तीची मुलगी आजारी असल्याने अकोला येथील खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी व्हेंटिलेटर वर ठेवण्याकरता डिपॉझिट ची मागणी केली असता संबंधित व्यक्तीने थेट हा संतोष बांगर (MLA Santhosh Bangar) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून व्यथा मांडली याचवेळी आमदार बांगर यांनी तात्काळ संबंधित डॉक्टरांना भ्रमणध्वनी देण्याचे सांगून पैशासाठी रुग्णाची अडवणूक का करता रुग्णाला तात्काळ व्हेंटिलेटरवर घ्या नाहीतर दवाखान्याला राख लावीन असा गर्भित इशारा इशारा दिला होता.
त्यानंतर आता कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आदिती माणिकराव सरकटे या मुलीला डेंग्यूच्या आजाराचे निदान झाले होते. त्या मुलीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत सुमारे तीन लाख रुपयांची औषधी मागवली. पैसे खर्च झाले तरी चालतील पण मुलीला धोका होता कामा नये या अशाने मुलीच्या कुटुंबीयांनी पदरमोड करून औषधीच्या खर्च केला.
त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सरकटे कुटुंबीयांकडे दोन लाख 80 हजाराची देयक दिले होते. त्यापैकी सरकटे कुटुंबीयांनी एक लाख 80 हजार रुपये जमा देखील केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून आणखी 85 हजार रुपये जमा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र हाती काहीही शिल्लक नसल्यामुळे सरकटे कुटुंबीयातील नातेवाईकाने थेट आमदार संतोष बांगर यांच्याशी संवाद साधला. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली.
परंतु संतापलेल्या आमदार बांगर (MLA Santhosh Bangar) यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. डेंग्यूच्या रुग्णाचे दहा दिवसात सहा लाख रुपये कुठल्या आधारावर होतात अशी विचारणा त्यांनी केली. रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्ण गंभीर होता असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही रुग्णाला अमृत पाजले का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृपया करून रुग्णांची पिळवणूक करू नका अशी विनंती त्यांनी रुग्णालय प्रशासनाला केली.
मात्र त्या उपरही रुग्णालय प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू कशी योग्य आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र आमदार बांगर यांचा संताप अनावर झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने नमते घेत उर्वरित पैसे माफ करण्याचे आश्वासन दिले. या प्रकारामुळे राज्यात पुन्हा एकदा रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची बाब पुढे आली आहे. परंतु काही रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांकडून होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीमुळे आमदार संतोष बांगर यांच्याशी संपर्क साधत असताना त्यांना तात्काळ न्याय मिळत असल्याने रुग्ण व नातेवाईकातून समाधान व्यक्त केले जात आहे.