Gadchiroli :- कोणत्याही जातीचा समावेश आदिवासी संवर्गामध्ये केला जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती गडचिरोली द्वारा दिनांक १५ ऑक्टोबर रोजी बंजारा, धनगर यांचा आदिवासी संवर्गात समावेश करू नये, आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेण्यात येऊ नये, जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) समिती गडचिरोली मधून इतर जिल्ह्यात स्थलांतरीत करू नये या प्रमुख मागण्यासह इतर १० मागण्यांबाबत मूळ आदिवासींचा आक्रोश क्रांती मोर्चा आयोजित केला होता.
मागण्यांबाबत मूळ आदिवासींचा आक्रोश क्रांती मोर्चा आयोजित
याच दिवशी ना. देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे आकस्मिक भेट दिली असता या भेटीचे औचित्य साधून आ.डॉ. मिलिंद नरोटे यांनी आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली. यावेळी मोर्चाचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना आदिवासी बचाव कृती समितीचे प्रतिनिधी अमरसिंग गेडाम, देवराव अलाम यांनी दिले . यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतर कोणत्याही जातीचा समावेश आदिवासी संवर्गामध्ये केला जाणार नाही हा माझा संदेश आपण आपल्या आदिवासी (Adivasi) समाजापर्यंत पोहचवावा असे जाहीर केले. याप्रसंगी आ. डॉ. मिलिंद नरोटे, माजी खा. अशोक नेते, माजी आ. डॉ. देवराव होळी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा .रमेश बारसागडे ,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे उपस्थित होते.