पानकनेरगावात महिलांचा दारूबंदीचा एल्गार!दारू विरोधात रणरागिणी एकवटल्या

“दारूमुळे आमचे संसार उद्ध्वस्त झाले… आता तरी गावात दारूबंदी झालीच पाहिजे”

पानकनेरगावात महिलांचा दारूबंदीचा एल्गार!दारू विरोधात रणरागिणी एकवटल्या

Alcohol Ban Maharashtra

ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर; “आमचे संसार वाचवा” म्हणत महिलांचे अश्रू अनावर

पानकनेरगाव (Alcohol Ban Maharashtra) : “दारूमुळे आमचे संसार उद्ध्वस्त झाले… आता तरी गावात दारूबंदी झालीच पाहिजे,” अशी आर्त हाक देत पानकनेरगाव येथील महिलांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमुखी मंजूर करून घेतला. या वेळी अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले असून संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते.

सेनगाव पोलिस स्टेशन हद्दीतील पानकनेरगाव येथे शुक्रवार, दि. २ मे २०२६ रोजी महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सौ. अर्चना चंद्रशेखर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता हनुमान मंदिर परिसरात ही ग्रामसभा पार पडली.

यापूर्वी दि. २३ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात महिलांच्या वतीने दारूबंदीबाबत अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अर्जाचे वाचन करून “दारूबंदीचा ठराव मंजूर करायचा का?” असा प्रश्न उपस्थित करताच उपस्थित महिलांनी एकमुखी “होय” म्हणत ठरावाला मंजुरी दिली.

पानकनेरगाव हे मानकेश्वर बाबांच्या श्रद्धेचे तसेच ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र अनेक वर्षांपासून गावात सुरू असलेल्या वैध व अवैध दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबांमध्ये भांडणे, कौटुंबिक कलह आणि आर्थिक अडचणी निर्माण झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

“दारूमुळे आमच्या संसाराचे वाटोळे झाले आहे. आम्हाला सुखाने जगू द्या,” अशी व्यथा ग्रामसभेत मांडण्यात आली. “दारूबंदी झालीच पाहिजे”, “दारू बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही महिलांना भावनिक होत भर सभेत रडू कोसळले.

दारूबंदी लागू करण्यासाठी आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे. “तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे. गाव वाचवायचे असेल तर दारूबंदी हाच एकमेव मार्ग आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.

दारूबंदीची अंमलबजावणी झाल्यास गावात पुन्हा सुख-समृद्धीचे दिवस येतील, अशी आशा महिलांनी व्यक्त केली आहे.

संबंधित सामग्री

ग्रामसभा ठरावाचे अहवाल सादर करताना ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण; अट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

ग्रामसभा ठरावाचे अहवाल सादर करताना ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण; अट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण करून जातीवाचक तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी मानोरा पंचायत समितीच्या शासकीय कार्यालयात घडली.

Aug 25, 2026