पालिका आणि पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देत ३ लाखांची मागणी; उर्वरित २५ हजार रुपये घेताना अंधेरी पोलिसांनी तिघांना पकडले
मुंबईतील अंधेरी परिसरात बांधकाम व्यावसायिकांवर तक्रारींचा दबाव निर्माण करून खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकामाविरोधात मुंबई महानगरपालिका तसेच पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देत पैसे मागितल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. संजय धोडमणी, प्रवीण सिंग आणि जीवन गुलाब पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते अंधेरी-जोगेश्वरी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेतील ओल्ड नागरदास रोड परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाचे काम सुरू होते. या बांधकामासंदर्भात मुंबई महानगरपालिकेत तक्रार दाखल करून तोडक कारवाई घडवून आणण्याची धमकी आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप आहे. कारवाई टाळण्यासाठी तब्बल ३ लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. यापैकी ९५ हजार रुपये यापूर्वीच स्वीकारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वारंवार होणाऱ्या या दबावामुळे त्रस्त झालेल्या बांधकाम व्यावसायिकाने अखेर अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकाजवळील आरसा हॉटेल परिसरात उर्वरित २५ हजार रुपये स्वीकारण्यासाठी आले असताना तिन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
तपास पुढे नेताना आरोपी एका संस्थेच्या नावाने तयार केलेल्या लेटरहेडचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या लेटरहेडच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक तसेच इतर कंपन्यांविरोधात महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तक्रारींचा आधार घेऊन संबंधित व्यावसायिकांवर दबाव वाढवणे आणि त्यानंतर पैसे मागणे, अशी कार्यपद्धती या टोळीची असल्याचा आरोप आहे. मागितलेली रक्कम न दिल्यास तक्रार सुरूच ठेवण्याची किंवा पालिका प्रशासनामार्फत कारवाईचा दबाव आणण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
अंधेरी पूर्व, जोगेश्वरी आणि एमआयडीसी परिसरात मागील काही महिन्यांपासून या आरोपींचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भागातील बांधकाम व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
या आरोपींनी आतापर्यंत आणखी किती व्यावसायिकांकडून अशा प्रकारे पैसे घेतले आहेत, या प्रकरणात इतर व्यक्तींचा सहभाग आहे का आणि याच टोळीने पूर्वी केलेल्या तक्रारींमागेही त्यांचाच हात आहे का, याचा तपास अंधेरी पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, आरोपींविरोधात यापूर्वी विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा काही बांधकाम व्यावसायिकांनी केला असून, त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, मकोका लागू करण्याचा निर्णय तपासातील निष्कर्ष आणि संबंधित कायदेशीर निकषांचा विचार करूनच घेतला जाणार आहे.
अंधेरी पोलिसांच्या या कारवाईनंतर तक्रारींचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकांकडून कथितरित्या खंडणी वसूल करण्याच्या प्रकाराला आळा बसतो का, याकडे आता परिसरातील व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.