बंजारा समाज मोर्चा

गावंडगावात स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना; १२ ऑगस्टला मोर्चाचा इशारा

Banjara Samaj Morcha: गावंडगाव येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

गावंडगावात स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना; १२ ऑगस्टला मोर्चाचा इशारा

Banjara Samaj Morcha

दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी; सकल गोर बंजारा आरक्षण समितीच्या नेतृत्वात आंदोलन

पातुर (Banjara Samaj Morcha) : गावंडगाव येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बंजारा समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. घटनेच्या निषेधार्थ गावंडगाव तांड्यातील सुमारे ५०० नागरिक चान्नी पोलीस ठाण्यात उपस्थित झाले होते. यावेळी संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करून दोषींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, प्रशासनाकडून तातडीने ठोस कारवाई न झाल्यास बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकल गोर बंजारा आरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततामय व संविधानिक मार्गाने मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व पुतळा संरक्षण समिती, गावंडगाव-अकोलाचे रामेश्वर ज. राठोड करणार असून, समितीचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाकडे विविध मागण्या

स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी तात्काळ एफआयआर दाखल करावा, दोषींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, घटनास्थळावरील सर्व पुरावे तपासावेत तसेच घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय विटंबना झालेल्या अर्धपुतळ्याची योग्य दुरुस्ती व पुनर्स्थापना करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी घटनास्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

“महापुरुषांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, तर १२ ऑगस्ट रोजी शांततामय व संविधानिक मार्गाने मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा रामेश्वर ज. राठोड यांनी दिला. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती चांन्नी ठाणेदार गंगाधर दराडे यांनी दिली आहे याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.