डिजिटल अरेस्ट

‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यापासून सावध राहा; बुलढाणा पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन

Digital Arrest Trap: वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही भीतीपोटी गुन्हेगारांच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन

‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यापासून सावध राहा; बुलढाणा पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन

Digital Arrest Trap

चिखली (Digital Arrest Trap) : नजीकच्या काळात सायबर गुन्हेगारांकडून सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ व सेवानिवृत्त नागरिकांना भीती दाखवून फसवण्यासाठी ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) या नवीन क्लृप्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही भीतीपोटी गुन्हेगारांच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​फसवणुकीची पद्धत (Modus Operandi)

सायबर भामटे नागरिकांना फोन किंवा व्हॉट्सॲप व्हिडिओ/व्हॉईस कॉलद्वारे संपर्क साधतात. ते स्वतःला सीबीआय (CBI), ईडी (ED), कस्टम्स (Customs), एनआयए (NIA) किंवा पोलीस विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे भासवतात. "तुमच्या नावावर बेकायदेशीर पार्सल आले आहे", "तुमच्या सिमकार्डवरून देशविरोधी कृत्य होत आहे" किंवा "तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंग होत आहे" अशी भीती त्यांना दाखवली जाते.

​त्यानंतर नागरिकांना घरातच व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आल्याचे सांगून तासनतास स्क्रीनसमोर बसवून ठेवले जाते. त्यांच्याकडून बँक खात्याचे तपशील, मौल्यवान दागदागिन्यांची माहिती घेतली जाते आणि या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढण्याच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी केली जाते.

​भारतीय कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ असा कोणताही प्रकार नाही

बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे (IPS) यांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय न्यायव्यवस्थेत 'डिजिटल अरेस्ट' नावाचा कोणताही कायदा किंवा प्रकार अस्तित्वात नाही. कोणतीही तपास यंत्रणा किंवा पोलीस दल व्हॉट्सॲप अथवा व्हिडिओ कॉलद्वारे कोणालाही अरेस्ट करत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा कॉल्सला घाबरू नये आणि कोणताही प्रतिसाद देऊ नये.

​पोलीस दलाकडून नागरिकांना महत्त्वाच्या सूचना:

​कॉल कट करा: असा संशयास्पद किंवा धमकीचा कॉल आल्यास न घाबरता तात्काळ कॉल कट करा.

​गोपनीय माहिती देऊ नका: अनोळखी नंबरवरून येणाऱ्या व्हॉट्सॲप कॉल्स किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती, OTP इत्यादी गोपनीय तपशील कोणाशीही शेअर करू नका.

​सोशल मीडियावर नियंत्रण ठेवा: वैयक्तिक किंवा दैनंदिन कामकाजाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (उदा. WhatsApp Status, Facebook, Instagram) सार्वजनिक करणे टाळा.

​तात्काळ संपर्क साधा: असा प्रकार घडल्यास किंवा संशय आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनशी त्वरित संपर्क साधा.

​फसवणूक झाल्यास तक्रार कुठे करावी?

ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा 1945 वर संपर्क साधावा अथवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.  

टैग्स: Digital Arrest Trap