सिमेंट रस्ता भेगा

आंबा-चोंडी शिवारातील सिमेंट रस्त्यावरील खोल भेग ठरली धोकादायक 

Cement Road Cracks: खोल भेगेमुळे अपघाताची गंभीर घटना घडली. या धोकादायक भेगेत सलग दोन दुचाकी अडकल्याने एका दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

आंबा-चोंडी शिवारातील सिमेंट रस्त्यावरील खोल भेग ठरली धोकादायक 

Cement Road Cracks

 

फुलधाबा येथील दोघे गंभीर, वाई येथील दांपत्य व तीन वर्षीय बालक सुखरूप बचावला 

आंबा चौंडी (Cement Road Cracks) : वसमत–औंढा नागनाथ मार्गावरील आंबा-चोंडी शिवारात सिमेंट रस्त्याला पडलेल्या मोठ्या आणि खोल भेगेमुळे अपघाताची गंभीर घटना घडली. या धोकादायक भेगेत सलग दोन दुचाकी अडकल्याने एका दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले, तर दुसऱ्या दुचाकीवरील दांपत्य आणि त्यांच्यासोबत असलेला तीन वर्षीय बालक सुदैवाने सुखरूप बचावला. त्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.

        प्राथमिक माहितीनुसार, वसमत–औंढा नागनाथ मार्गावरून जात असताना औंढा तालुक्यातील फुलधाबा येथील रहिवासी गणेश काळे आणि भीमराव काळे यांच्या दुचाकीचे चाक आंबा-चोंडी शिवारातील सिमेंट रस्त्यावरील खोल भेगेत अचानक अडकले. त्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन दोघेही रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले.या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील  नागरिकांनी तसेच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने मदत करून त्यांना रस्त्याबाहेर काढले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमी गणेश काळे आणि भीमराव काळे यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, पहिल्या अपघातानंतर काही वेळातच वसमत तालुक्यातील वाई येथील दांपत्याची दुचाकीही त्याच भेगेत अडकली. मात्र, त्या दुचाकीवर असलेले दांपत्य आणि त्यांच्या सोबत असलेला तीन वर्षीय बालक सुदैवाने बालंबाल बचावला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. नागरिकांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

 रस्त्याच्या दुरावस्थेवर यापूर्वीही वृत्तातून लक्ष वेधले
वसमत–औंढा नागनाथ मार्गावरील सिमेंट रस्त्यावरील भेगा आणि झालेल्या दुरवस्थेबाबत दैनिक देशोन्नतीने यापूर्वीही अनेक वेळा वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते. मात्र, अद्यापही या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या नसल्याने वाहनधारकांना धोका कायम असल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वसमत–औंढा नागनाथ मार्गावरील सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगा विशेषतः दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत असून, वाहनांचे चाक अचानक अडकल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

या रस्त्यावरील धोकादायक भेगा तातडीने बुजवाव्यात, रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे करावीत तसेच वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकां कडून करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातामुळे वसमत–औंढा नागनाथ मार्गावरील रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्ता सुरक्षित करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टैग्स: Cement Road Cracks