रिसोड : वाशिम येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ प्रकारात ‘सनराईज इंग्लिश स्कूल’ची विद्यार्थिनी कु. ओवी संजय पवार हिने १७ वर्षांखालील (अंडर-१७) मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले आहे. या शानदार यशाच्या जोरावर तिची अमरावती येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यापूर्वी ९ सप्टेंबर रोजी आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. यात १४ वर्षांखालील गटातून साईराज देशमुख (इयत्ता ६ वी) आणि समर्थ सरोदे (इयत्ता ८ वी), तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून अधिराज नागरे (इयत्ता ९ वी) व रुद्र जायभाये (इयत्ता १० वी) यांनी विजय मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत स्थान निश्चित केले होते.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल दि आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, सचिव नकुलदादा देशमुख, शाळेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमुख तसेच विश्वस्त चैतन्यभैय्या देशमुख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. यासोबतच शाळेच्या प्राचार्या सौ. रोजमेरी जोस यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.